मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना न्याय मिळणार कधी ?

0

जनसंग्राम संघटनेचा प्रांताधिकार्‍यांना सवाल

फैजपूर- मैत्रेय कंपनीने जास्त व्याजाचे आमिष देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित करीत एजंटांनी कमिशनच्या लोभातून कंपनीला करोडो रुपयांची गुंतवणूक दिली. राज्यात 20 लाख लोकांची दोन ते अडीच हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली असून मैत्रेय कंपनीचे ठेवीदार गेल्या तीन वर्षांपासून आपल्याच पैशांसाठी हैराण आहेत. प्रशासकीय पातळीवर मैत्रेयच्या बाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने मैत्रेयच्या ठेवीदारांना न्याय मिळणार कधी ? असा सवाल जनसंग्राम संघटनेच्या वतीने करण्यात आला र्ींज्ञसीफ जळगाव जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना तात्काळ न्याय द्या अन्यथा रस्त्यावरील लढाई उभारण्यात येईल, असा ईशारा सुद्धा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

फैजपूर प्रांताधिकार्‍यांना निवेदन
जनसंग्रामचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात मैत्रेय कंपनीत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांची भेट घेऊन आपले निवेदन दिले. मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण अधिनियम (एमपीआयडी) 1999 या कायद्याने संचालकांच्या मालमत्ता विक्रीतून तीन महिन्यात ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचा परतावा करण्याची स्वयंस्पष्ट तरतूद असतांना प्रशासकीय पातळीवर याकडे दुर्लक्ष केले जात असून राजकीय दबावातून मैत्रेयच्या संचालकांना अभय दिले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की जिल्हापेठ पोलिसांत दाखल गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर होऊन वर्ष-सव्वा वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर सुद्धा न्यायालयात दाखल दोषारोपपत्रातील मालमत्ता जप्तीची कार्यवाही थंड बस्त्यात आहे. या प्रकरणी तात्काळ दखल होऊन मैत्रेयच्या ठेवीदारांना न्याय मिळावा अन्यथा जनसंग्रामच्या वतीने ‘इन्साफ दो’ सभा आयोजित करण्यात येतील असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर विजया भंगाळे, चेतना चौधरी, जयश्री भंगाळे, सुशीला चौधरी, अरुण भंगाळे, आकाश गावंडे, कौशल्या भंगाळे, नंदाबाई दोडके, नलिनी भंगाळे, मीराबाई भंगाळे, दीपाली नेमाडे, कल्पना भंगाळे, तुकाराम पाटील, लताबाई भंगाळे, रमेश पाटील, रेखा भंगाळे, शोभाबाई धांडे, वंदना कुंदन भंगाळे, वंदना कैलास भंगाळे, शशिकला ढाके, प्रीती भंगाळे, संगीता चंद्रकांत भंगाळे, माधुरी बर्‍हाटे, नमिता भंगाळे, मंदा नेमाडे आदींच्या सह्या आहेत.

गुंतवणूकदारांनी जनसंग्रामकडे संपर्क करण्याचे आवाहन
मैत्रेयमध्ये नाहक अडकून पडलेल्या हक्काच्या पैशांचा परतावा तत्काळ व्हावा यासाठी प्रशासनाला ठेवी परत करण्याचा कृती कार्यक्रम जाहीर करण्यास भाग पाडणे किंवा वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेऊन सुद्धा जनसंग्राम बहुजन लोकमंच या सामाजिक संघटनेकडून लढा उभारण्यात येणार आहे. रावेर-यावल तालुक्यातील मैत्रेयच्या सर्व गुंतवणूकदार व एजंट यांनी लढ्यात सहभागी होण्यासाठी जनसंग्रामच्या निंभोरा येथील कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन संघटनेचे राज्य समन्वय सचिव वाय.डी.पाटील यांनी केले आहे.