जळगाव । कंपनीने ठेवीदारांची ठेव परत करुन प्रतिनिधींची होणारी हेळसाड थांबवून ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी उद्या 18 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती मैत्रेय उपभोक्ता एवम अभिकर्ता असोसिएशनने पत्रकार परिषदेत दिली. उद्या सकाळी 11.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
आतापर्यंत 2800 करोड रुपयांच्या ठेवी अडकून
1998 साली स्थापन झालेल्या मैत्रेय कंपनीने 27 लाख 2 हजार ठेवीदारांची 2800 करोड ठेवी अडकवुन ठेवल्या आहेत. यामुळे अनेक ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले असून कंपनीच्या प्रतिनिधींवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. तसेच समाजामध्ये प्रतिनिधींना अपमानास्पद वागणुक मिळत आहे. मैत्रेय कंपनीचे कार्य अतिशय सुरळीतपणे सुरु असतांना 2015 मध्ये कंपनीचा पहिला धनादेश बाऊंस झाला.
उपासमारीची आली वेळ
गेल्या वर्षभरापासून कंपनीच्या कोणत्याही जबाबदार व्यक्तिंनी ठेवीदारांशी अथवा प्रतिनिधींशी संपर्क साधलेला नसल्याने ठेवीदारांमध्ये संशयाचा काहूर माजले आहे. कंपनीचे 1 लाख प्रतिनिधी कार्यरत होते. कंपनीने संपत्ती विकून ठेवीदारांची ठेवी परत करुन ठेवीदार व प्रतिनिधींना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास संपुर्ण राज्यभरात रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज धुळे, 21 रोजी नाशिक, 24 रोजी परभणी येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.
विविध पक्षांचा पाठींबा
मोर्चाला भाजपा, शिवसेना, महिला आघाडी, कॉग्रेस, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जळगाव फर्स्ट, जनसंघ आदी पक्ष व संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. या कंपनीत 70 टक्के महिला कार्यरत असून समाजात व नातेवाईकांमध्ये त्यांना अपमानास्पद वागणुक मिळत आहे. मानसिक धक्काने चार प्रतिनिधींनी दगावले असून त्यांचे परिवार उघड्यावर आले आहे.