पारोळा । मैत्रेय उद्योग समूहात हजारो प्रतिनिधींचा घामाचा पैसा अडकला. त्यांना न्याय मिळावा म्हणून हा विषय विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू, अशी ग्वाही आमदार डॉ. सतीश पाटील यांनी येथे दिली. मैत्रेय प्रतिनिधींनी तहसील कार्यालयावर सोमवार मोर्चा काढला. त्यात संवाद साधताना ते बोलत होते. शहरातील राम चौक भागातून रथ चौक, नगरपालिका चौकमार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मैत्रेय समूहात ग्राहकांच्या ज्या पॉलिसी आहेत, त्यांचा परतावा मिळत नसल्याने हा मोर्चा काढण्यात आला.
आमदार डॉ. सतीश पाटील यांनाही मोर्चेकर्यांनी निवेदन दिले. त्यांनी ते स्वीकारून आवाज उठवू, अशी ग्वाही दिली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, पारोळा मनसे तालुकाअध्यक्ष प्रविण पाटील, छावा संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनीही पाठिंबाद दिला. मोर्चाचे नेतृत्व सुवर्णा पाटील, सुनंदा शेंडे, विजय शिंदे, योगेश शेंडे, महेंद्र जैन (पिंटू दर्डा) यांनी केले. पारोळा शहरात बहादरपूर रस्त्याला लागून मैत्रेय उद्योग समूहाचे सुमारे 35 हजार स्क्वेअर फूट प्लॉट आहे अशी माहिती मोर्चेकर्यांनी दिली.