मैदानांनाही ‘हेरिटेज’ दर्जा द्यावा

0

पुणे । खेळाचे महत्त्व शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणामध्ये खेळ या विषयाचा समावेश करायला हवा. असा विषय अभ्यासक्रमात ठेवल्यास अनेक चांगले बदल विद्यार्थ्यांमध्ये बघायला मिळतील. आपल्याकडील अनेक शाळांना मैदाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी खेळांपासून वंचित राहत आहेत. ज्या गतीने आपल्याकडील मैदाने कमी होत आहेत, त्याचा विचार करता मैदानांनाही हेरिटेजचा दर्जा द्यावा लागेल, असे मत सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मिशन यंग अ‍ॅण्ड फिट इंडिया राबविण्यात येणार असून या मिशनच्या उद्घाटन सोहळ्यात सचिनच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सचिन बोलत होता.

शालेय अभ्यासक्रमात खेळ विषय हवा
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिन यांची मुलाखत घेतली. सचिन तेंडुलकरने मुलाखतीत अनेक प्रश्‍नांना उत्तरे दिली. आपल्या आयुष्यातील खेळाचे महत्त्व त्यांनी आधोरेखित केले. खेळामुळे आयुष्यात अनेक बदल झाले असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. शाळेच्या मैदानांबाबत विचारले असता सचिन म्हणाला, तुम्ही जसा विचार करता तसे परिणाम तुम्हाला मिळत असतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करायला हवा. भारतीयांनी आपले विचार बदलले तरच आपल्याला चांगले परिणाम पाहायला मिळतील. लहान मुलांनी मस्ती करणे, मित्रांसोबत वेळ घालवणे, दंगा करणे तितकेच आवश्यक आहे. आपली शक्ती योग्य गोष्टींमध्ये आपण गुंतवायला हवी. मला माझ्या घरच्यांनी खेळासाठी नेहमीच सहकार्य केले. तंदुरस्त राहण्यासाठी खेळ हे आवश्यक आहेत. केवळ तरुणांनीच नाही तर सर्वांनीच खेळ खेळायला हवेत. त्याचबरोबर नवनवीन खेळही आपण शोधून काढले पाहिजे. खेळातूनच सर्वांच एकिकरण होत असते. सध्या विविध सोशल माध्यम आली आहेत. ती जेव्हा नव्हती तेव्हा आपले आयुष्य तणावमुक्त होते.

क्रिकेट माझ्या जीवनाचा ऑक्सिजन
शॉर्टकटचा अवलंब न करण्यावर भाष्य करताना सचिनने एक उदाहरण दिले. सचिन म्हणाला, पेपरमध्ये नाव येण्यासाठी त्यावेळी 30 रण काढाव्या लागत असत. मी एकदा 24 रण काढल्या. स्कोअर लिहिणार्‍याने त्या 30 लिहिल्या. त्यावेळी सरांनी किती रण काढल्या असे विचारले असता सचिनने प्रामाणिकपणे 24 रण काढल्याचे सांगितले. मात्र, स्कोअर लिहिणार्‍यास विरोध न केल्याने प्रशिक्षक सचिनला म्हणाले, पेपरात नाव यायचे असेल तर स्वतःच्या जीवावर रण काढल्या पाहिजेत. त्यामुळे यशासाठी कुठलाही शार्टकट घेऊ नये. सचिन पुढे म्हणाला, ज्यावेळी समस्येवर लक्ष न देता तिच्या उपायावर लक्ष केंद्रीत करु त्यावेळी आपल्याला मार्ग नक्की सापडेल. आपल्या आयुष्यातील क्रिकेटचे महत्त्व सांगताना सचिन म्हणाला, क्रिकेट म्हणजे माझ्या जीवनाचा ऑक्सिजन आहे.