मैदानात ‘काही चेंडू सोडून द्यायचे’ असतात

0

पिंपरी-चिंचवड – डॉक्टरांना बढत्या दिल्यावर लगेच पालिकेच्या ’वायसीएमएच’ रुग्णालयाची परस्थिती सुधारणार आहे का? असा प्रतिसवाल सभागृह नेते एकनाथ पवार यांनी उपस्थित केला. तसेच सल्लागार नेमणुकीवर होणा-या टीकेबद्दल विचारले असता, ’काही चेंडू सोडून द्यायचे’ असतात असे सांगत त्यावर त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. दरम्यान, विधी समितीचे पदाधिकारी बढत्यांचे प्रस्ताव मंजुर करण्यासाठी डॉक्टरांना फोन करत असल्याची, चर्चा पालिका वर्तुळात जोरदार रंगली आहे.

बढती दिल्यामुळे वायसीएम सुधारणार?
महापालिकेच्या विधी समितीने गेल्या महिन्याभरापासून डॉक्टरांच्या बढत्याचे प्रस्ताव रोखले आहेत. त्यावरुन विधी समितीवर मोठ्या प्रमाणात गैरव्यहाराचे आरोप झाले. ‘मांडवली’ होत नसल्यामुळेच प्रस्ताव रोखल्याचा आरोप देखील विधी समितीवर विरोधकांनी केला होता. त्याबाबत पवार म्हणाले, वैद्यकीय उपअधिक्षकपदी डॉ. शंकर जाधव यांची पदोन्नती करण्यास काही डॉक्टरांनी आक्षेप घेतला आहे. तसेच डॉक्टरांना बढत्या दिल्यावर लगेच ’वायसीएमएच’ची परस्थिती सुधारणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आरोपांवर पवारांचे मौन
महापालिका गेल्या काही दिवसांपासून विविध छोट्या-मोठ्या कामांसाठी सल्लागार नेमत आहे. त्यावरुन विरोधकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्ताधा-यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी तर आयुक्त श्रावण हर्डीकर आणि पदाधिका-यांना सल्ला देण्यासाठी सल्लागार नेमण्याची उपरोधीक मागणी केली होती. त्यावर ’काही चेंडू सोडून द्यायचे’ असतात असे सांगत एकनाथ पवार यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.