मैदानावर शिकलेली कौशल्ये जीवनात सगळीकडे उपयोगी पडतात

0

पुणे । मैदानावर शिकलेली कौशल्ये जीवनात सगळीकडे उपयोगी पडतात. मुलांनी एखादा छंद अवश्य जोपासावा. छंद असणारी व्यक्ती कधी निराश होत नाही. बालरंजन हा एक यज्ञ आहे. ह्या यज्ञातल्या एका सुंदर कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले; याचा आनंद वाटतो. बालकारणाची चळवळ सातत्याने चालविल्याबद्दल माधुरीताई व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करते असे गौरवोद्गार आमदार मेधा कुलकर्णी यांनी काढले. भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या त्रिदशकपूर्तीच्या समारंभात त्या बोलत होत्या.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचा बालरंजन केंद्राला दिलेला शुभेच्छा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला. यामध्ये जावडेकर यांनी यंदापासून अशा शाळाबाह्य उपक्रमांचा केंद्र सरकार शिक्षणात समावेश करणार असल्याचे सांगून; माधुरीताईंच्या बालरंजनसारखी केंद्र शहरात ठिकठिकाणी निर्माण होण्याची गरज प्रतिपादन केली.

बालरंजन केंद्रातील मुलांनी नेत्रदीपक प्रात्याक्षिके सादर केली. दोरीखाळून रांगत जाणे, दोरीवरून उद्या मारणे, पावलांच्या रंगीत ठशांवर उड्या मारणे, पराशूटचे खेळ, आकर्षक कवायत, अनाकोंडा, बास्केट बॉल आदी नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिकांचा त्यात समावेश होता. पालक व उपस्थित पाहुण्यांनी टाळ्यांच्या गजरात मुलांचे कौतुक केले.

चिकाटी व सहनशीलतेचे द्योतक
खासदार अनिल शिरोळे म्हणाले, 30 वर्षे काम करणे हे चिकाटी व सहनशीलतेचे द्योतक आहे. नगरसेविका सहस्रबुद्धे यांनी ते करून दाखविले. त्यांच्या कामात सहभागी व्हायला मला नक्की आवडेल. डॉ.प्र.चिं.शेजवलकर म्हणाले, बालरंजनचे आजचे स्वरूप हे सहस्रबुद्धे यांच्या तपश्‍चर्येचे फळ आहे. बालरंजन केवळ भारती निवास सोसायटीचेच नाही तर समाजाचे भूषण आहे. या कामासाठी टीम वर्कची गरज आहे.नाविन्याचा ध्यास हे माधुरीताईचे वैशिष्ट्य आहे आणि माणसांशी संवादाचे कसब त्यांच्या अंगी आहे.