कोथरूड । शहरात मुलांना खेळण्यासाठी मैदाने कमी पडत आहेत. त्यांच्या क्रीडा कौशल्यासाठीच्या विकासासाठी मैदानांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात मैदाने ब क्रीडांगणासाठी आरक्षण टाकण्यात आली आहेत. ही आरक्षणे बदलू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळ पडली तर त्यासाठी सर्वांनी सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी केले. महेश बालभवनचा रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सायंकाळी पार पडला. त्यावेळी खा. चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
रौप्य्महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, धनराजजी राठी, अतुल लाहोटी, संगीत लाहोटी, गणेश मुंदडा, रमेश धूत, सुशीला राठी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालभवनच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके यावेळी महापौर मुकता टिळक, खा. वंदना चव्हाण, मुरलीधर मोहोळ, श्री धनराजजी राठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी सर्वचजण झटत आहेत. परंतु मुलांच्या मानसिक परिस्थितीकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे काही मुले मानसिदृष्ट्या कमकुवत होतात. हे चित्र बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांचे मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे महापौर टिळक यांनी यावेळी सांगितले. संगीता लाहोटी यांनी प्रास्ताविक, संगीत पिपंळीकर यांनी सूत्रसंचालन तर गणेश मुंदडा यांनी आभार मानले.