सेनापती बापट रस्त्यावर केलेल्या या प्रयोगाने नागरिकांना त्रास
पुणे । दहशतवादी हल्ला झाला तर आपली सुरक्षा यंत्रणा सुसज्ज असावी यासाठी अधूनमधून मॉकड्रील केले जाते. उद्देश चांगला असला तरीही अचानक करण्यात येणार्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होतात. वाहतुकीचा बोजवारा उडतो आणि अफवांना ऊत येतो याचा कुणीच विचार करीत नाही. असाच प्रकार मंगळवारी संध्याकाळी सेनापती बापट रस्त्यावर करण्यात आलेल्या मॉकड्रिलमुळे घडला. त्यामुळे मॉकड्रिल आवश्यक असले तरीही नागरिकांना होणार्या मनस्तापाचा विचार झाला पाहिजे.
मंगळवारी संध्याकाळी नॅशनल सिक्युरीट गार्ड (एनएसजी) कमांडोच्या दिल्ली येथून आलेल्या दोन पथकांनी पुण्यामध्ये मॉकड्रिल केले. ही दोन पथके विमानाने पुण्यात आली आणि अवघ्या काही मिनिटांतच विमानतळावरून सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस महाविद्यालयात दाखल झाली. या पथकाकडून इन्स्टिट्यूटमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली.
गर्दीच्यावेळी वाहतूक वळविल्याने कोंडी वाढली
मात्र या मॉकड्रिलमुळे सेनापती बापट रस्त्यावरील वाहतूक भांडारकर इन्स्टिट्युटजवळील चौकापासून थेट चतुशृंगी मंदिरापर्यंत बंद करण्यात आली होती. ऐन गर्दीच्या वेळी या रस्त्यावरील वाहतूक दुसर्या मार्गाने वळविण्यात आल्याने परिसरातील सर्व रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कारण स्पष्ट होत नसल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये अफवांना ऊत आला होता. डेक्कन परिसरातीही सर्व रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हनुमाननगर, पत्रकारनगर, शिवाजी हौसिंग सोसायटी आणि सेनापती बापट रस्त्यावर राहणार्या नागरिकांना याचा प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास झाला. नेमका काय प्रकार चालू आहे, कशासाठी रस्ता बंद केला आहे हे नागरिकांना समजत नव्हते. त्यामुळे त्यांनी सेनापती बापट रस्त्यावर बॅरिकेड्स लावून उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी उद्धटपणे उत्तरे दिली. वास्तविक नागरिकांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील गोंधळ कमी करणे हे पोलिसांचे काम असते. एका नागरिकाने या पोलिसांना नीट माहिती देण्यास सांगितले असता सरकारी कामात अडथळा आणला म्हणून अटक करण्याची धमकी दिली.
रात्री उशिरापर्यंत सुरू होते
त्याचवेळी रात्री एक जोडपे आपल्या दीड वर्षाच्या मुलीला आणि पाच-सहा वर्षाच्या मुलाला घेऊन या ठिकाणी आले. त्यांचे घर बालभारतीजवळच होते. त्यांनी घरी जाण्यासाठी पोलिसांना सांगितले असता त्यांनाही घरी जाऊ देण्यात आले नाही. हाकेच्या अंतरावरील घर त्यांना दिसत होते पण या मॉकड्रिलमुळे आणि पोलिसांच्या उद्दाम वागणुकीमुळे त्यांना रात्रभर दोन मुलांना घेऊन रस्त्यावर थांबावे लागले. ‘आम्ही कुठे जायचे?’ असा प्रश्न विचारला असता ‘लॉजमध्ये जाऊन राहा’ असे उत्तर या पोलीस कर्मचार्यांकडून मिळाले. एकूणच या प्रकाराने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. हे मॉकड्रिल रात्री उशिरापर्यंत सुरू होते.