मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची मतदार जागृती फेरी

0

निगडी : भोसरी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी निवडणुकीत जागृतपणे मतदान करावे यासाठी निगडी येथील मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. यावेळी मॉडर्नच्या ढोल पथकाच्या गजरात संपूर्ण यमुनानगर परिसर दुमदुमून गेला होता. निवडणूक विभागाकडून 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान नवीन मतदार नोंदणी अभियान चालू केले आहे. लोकांमध्ये याबाबतची जागृती करण्यासाठी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी फेरीत सहभाग घेतला.

यावेळी मतदार यादीत नाव नोंदवा, आपले मत आपले भविष्य, निर्भयपणे मतदान करा, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, सारे काम छोडो दो सबसे पहले वोट दो विविध घोषणा देत विद्यार्थी सर्वाना संदेश देत होते. यावेळी हवेलीच्या नायब तहसीलदार अंजली सावंत, प्राचार्य सतीश गवळी, संस्था उपकार्यवाह शरद इनामदार, मतदार पर्यवेक्षक हनुमंत सुतार, सुरेखा कामथे, निवडणूक विभाग कर्मचारी प्रशांत पाडळे, बबन उगले आदींनी सहभाग घेतला. फेरीचे नियोजन मतदार नोंदणी अधिकारी मॉडर्नचे शिक्षक शिवाजी अंबिके, मनीषा बोत्रे, सुनंदा खेडेकर, जयश्री चव्हाण, विजय गायकवाड यांनी केले.