मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट

2
प्राचार्य सतीश गवळी यांच्या संकल्पनेतील ‘भिंती पलीकडील शाळा’ अंतर्गत राबविला उपक्रम
10 विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला या उपक्रमात सहभाग 
निगडी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यमुनानगर, निगडीच्या विद्यार्थ्यांनी पोलिस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. प्राचार्य सतीश गवळी यांच्या संकल्पनेतील ‘भिंती पलीकडील शाळा’ अंतर्गत या उपक्रमात प्रशालेतील प्रतिनिधिक 10 विद्यार्थी आणि शिक्षकांनी यात सहभाग घेतला. गृहखात्यातील कामकाजाची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रशासनातील कामकाजाची पद्धत व माहिती व्हावी आणि पुढील जीवनात या गोष्टीचा फायदा व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आयुक्तांचा केला सत्कार
विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या कक्षात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. याप्रसंगी प्राचार्य सतीश गवळी यांनी प्रशालेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व संस्थेची आणि शाळेची पूर्ण माहिती दिली. यावेळी या विद्यार्थ्यांनी पोलीस दलाबद्दल वाटणारी भीती बोलून दाखवित पोलिसांच्या कामाबद्दल माहिती घेतली. तपास यंत्रणा, शिक्षण, यातील करीअर, गुंडांवरील कारवाई आदींबाबत या विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने प्रश्‍न विचारले. आयुक्त पद्मनाभन यांनीही या मुलांना योग्य उत्तरे देत त्यांच्या ज्ञानामध्ये भर घातली. आयुक्तांसमवेत केलेल्या वार्तालापामुळे एकुणच पोलिसांबद्दल असलेली भिती दूर गेली.
विद्यार्थ्यांनी घेतली मुलाखत
तुमचे शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले याला उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, माझे शिक्षण माझे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले परंतू तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून घेतले पाहिजे. आजची तरुणाई ग़ैरवर्तन किंवा गुन्हे करतात ते थांबवण्यासाठी तुम्ही कोणता संदेश द्याल यावर आयुक्तांनी सांगितले की, वारंवार पोलिसांकडे तक्रार करावी. पिंपरीपासून पुढे कुठपर्यंत आपली हद्द आहे यावर ते म्हणाले की, चाकण ते हिंजवडी एवढे आपले कार्यक्षेत्र आहे. शहराचा कारभार कसा संभाळता, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो यावर आयुक्त म्हणाले की, शहराचे कामकाज सांभाळण्या साठी आमची सर्व सहकारी मंडळी आहेत. तुमच्यासारख्या लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळतो. तुम्ही गुन्हेगारी कशी आटोक्यात आणता असे विचारल्यावर आयुक्तांनी सांगितले की, माझे सर्व सहकारी अधिकारी यांच्या सहकार्यामुळे गुन्हेगारी आटोक्यात येते. तुम्ही सर्व ठिकाणी तक्रार पेटी बसवली आहे त्यामुळे काही फरक पडला आहे का यावर आयुक्त म्हणाले की, पूर्णपणे नाही,पण आधीपेक्षा कमी प्रमाण आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारले असता त्यांनी त्याची उत्तरे हसत खेळत विद्यार्थ्यांना दिली. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, संस्थेच्या सहसचिव ज्योत्स्ना एकबोटे व शालासमिती अध्यक्ष शरद इनामदार यांनी केले. उपक्रमाचे नियोजन खंडू खेडकर, जयश्री चव्हाण, हनुमंत तापकीर यांनी केले.