पुणे : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून रविवारी अंदमानच्या दक्षिण समुद्र, निकोबार बेट, आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला असल्याचे हवामान विभागाने रविवारी दुपारी जाहीर केले. पोषकस्थितीमुळे दरवर्षीपेक्षा साधारण 6 दिवस अगोदरच मान्सूनचे आगमन झाले आहे. सर्वसाधारणपणे 20 मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर पुढील दहा दिवसांत म्हणजेच एक जूनपर्यंत तो श्रीलंका व्यापून केरळात प्रवेश करतो. यावर्षी 15 मे पर्यंत मोसमी वारे अंदमानात येतील, असा अंदाज होता. पण, मॉन्सून 6 दिवस अगोदर दाखल झाल्याने भारतातही लवकर आगमन होऊ शकते.
सहा राज्यात दोन दिवसांत जोरदार पाऊस
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर छत्तीसगड आणि विदर्भात उष्णतेची लाट असेल. अंदमान-निकोबार बेटांवर दरवर्षी साधारणपणे 20 मे रोजी मॉन्सून दाखल होतो. पूर्व आणि पश्चिम अशा दोन शाखांद्वारे मॉन्सूनचा भारतात प्रवास होत असतो. अंदमानात दाखल झाल्यानंतर केरळमध्ये एक जून, तळकोकणात पाच ते सात जूनच्या सुमारास मॉन्सूनचे आगमन होते. त्यानंतर विविध भागांत सक्रिय होत 15 जुलैपर्यंत मॉन्सून देश व्यापतो.
सरासरीहून जास्त पाऊस
यावर्षी साधारणपणे सरासरी 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. देशात नेमका किती पाऊस होईल, हे चित्र जूनच्या पहिल्या आठवड्यात अधिक स्पष्ट होईल, असे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. बंगालच्या उपसागरात मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असल्याने येत्या चार दिवसांत मॉन्सून अंदमानात दाखल होईल, असा अंदाज होता. पण रविवारीच मॉन्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान-निकोबार बेटांवर जोरदार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने आणि गेल्या तीन आठवड्यांत परिस्थिती अनुकूल झाल्याने यावेळी देशभरात सरासरीहून जास्त पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़