स्थानिकांना हा रोजचा त्रास
चिंचवडः चिंचवडमधील सेंट्रल मॉलमध्ये येणार्या ग्राहकांसाठी मॉलमध्ये पार्किंगची जागा कमी आहे. त्यामुळे ग्राहक मुख्य रस्त्याच्या तसेच मॉलशेजारील गल्लीमध्ये दिसेल त्या ठिकाणी वाहने लावतात. यामुळे स्थानिक नागिरकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रविवारी सायंकाळी ग्राहकांनी केलेल्या मनमानी पार्किंगवरून स्थानिकांसोबत वाद झाला. सनी कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील सेंट्रल मॉलच्या शेजारी श्राद्ध हेरिटेज, गुलमोहर या वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सेंट्रल मॉलमध्ये येणारे ग्राहक मॉलमध्ये जागा कमी असल्याने मॉलच्या बाहेर रस्त्याच्या बाजूला मिळेल तिथे वाहने लावतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना, लहान मुलांना वावरण्यासाठी खूप त्रास होतो. मॉल सुरु झाल्यापासून ही अडचण आहे. मॉल प्रशासन याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही.
मॉल प्रशासनाचे मौन
आज सायंकाळी एक ग्राहक आपली कार घेऊन आला. त्याने हेरिटेज वसाहतीच्या समोर कार पार्क केली. वसाहतीत राहणारे नागरिक राजेश कानडे आणि अन्य नागरिकांनी त्या ग्राहकाला कार पार्किंग करण्यासाठी मज्जाव केला. त्यामुळे त्या ग्राहकाने नागरिकांसोबत उद्धटपणाचे वर्तन केले. दोन्ही बाजूंनी वाद टोकाला गेला. मात्र यात मॉल प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही. चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मागील वर्षी वसाहतीतील नागरिकांनी पोलिसांना याबाबत लेखी निवेदन दिले होते. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता यावेळी पुन्हा पोलीस तक्रार देण्याची सूचना देत आहेत, असेही सनी यांनी सांगितले. शहरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला जेवढी जागा उपलब्ध आहे, त्यापेक्षा जास्त शहरात वाहने आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यावर तोडगा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. परंतु नागरिक आणि प्रशासन दोघेही याकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही.