मॉस्को । मॉस्कोजवळील क्रॅटोव्हो गावात राहणारा झेकोव्हने शनिवारी त्याच्या राहत्या घऱातून रस्त्याच्या दिशेने केलेल्या अंदाधूंद गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत या माथेफिरुचा खात्मा झाला असून इगॉर झेकॉव्ह असे हल्लेखोराचे नाव आहे. रशियाच्या आपातकालीन यंत्रणेत असताना त्याने अफगाणिस्तान आणि चेचेन्यामध्ये काम केल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात उघड झाली आहे. मॉस्कोजवळील क्रॅटोव्हो गावात राहणारा झेकॉव्हने शनिवारी त्याच्या राहत्या घरातूनच रस्त्याच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराने परिसरात खळबळ माजली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि झेकॉव्हमध्ये बराच वेळ चकमक सुरु होती. या माथेफिरुने पोलिसांवर ग्रॅनेडही फेकले होते. चकमकीदरम्यान माथेफिरुने घरालगतच्या जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला कंठस्नान घातले. चकमकीदरम्यान तब्बल 14 वेळा स्फोटाचा आवाज आल्याचे स्थानिकांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. झेकॉव्ह हा मनोरुग्ण होता असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मनोरुग्ण असतानाही त्याच्याकडे बंदुक आणि ग्रेनेड कसे आले असा सवाल आता उपस्थित होत आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील तीन जवानांसह सुमारे 10 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. झेकोव्हच्या घरातून दोन मृतदेह सापडले असून त्याने केलेल्या गोळीबारात दोन पादचार्यांचा मृत्यू झाला आहे. 50 वर्षीय झेकॉव्ह हा त्याच्या आईसोबत राहत होता. दोन महिन्यापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले असून तेव्हापासून तो घरात एकटाच राहत होता.