मोंढाळे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार पोटनिवडणूक

0

सातपैकी तीन ग्रामपंचायतीच्या जागा बिनविरोध

भुसावळ- तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी एक जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यानुसार सात पैकी चार ग्रामपंचातीच्या पोटनिवडणुकीसाठी पाच नामनिर्देशन पत्र सादर झाले होते. यामध्ये शिंदी, आचेगाव आणि पिंप्रीसेकम या गावातून प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र सादर झाल्याने या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली आहे तर मोंढाळा गावातून दोन नामनिर्देशन दाखल असून या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

मोंढाळेत सरळ लढत ; प्रशासनाची तयारी
तालुक्यातील पिंप्रीसेकम-निंभोरा बुद्रुक, मोंढाळा, अंजनसोंडे, गोजोरा, चोरवड-खेडी, आचेगाव आणि शिंदी अशा सात गावांच्या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार बुधवार, 16 रोजी माघारीची अंतीम मुदत होती. यामध्ये मोंढाळे गावातील पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पैकी एकाही उमेदवारांने माघार घेतली नाही यामूळे या गावात प्रभाग क्रमांक एकमध्ये अनुसूचीत जमाती महिला प्रवर्ग या एका जागेसाठी 27 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. लताबाई भिकारी साळुंके आणि तुळसाबाई मांगो पारधी यांच्यात लढत होणार आहे तर निंभोरा-बुद्रुक येथे सर्व साधारण महिला-उषा एकनाथ बोरोले, आचेगाव-सर्वसाधारणसाठी सुरेश गिरधर झांबरे आणि शिंदी-नागरीकांचा मागास प्रवर्गसाठी नवलसिंग पंचमसिंग राजपूत यांचे प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र सादर झाले. यामुळे गावांतून या तिघांची बिनविरोध निश्चित झाली आहे. मात्र मोंढाळे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असल्याने प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक तयारीला प्रारंभ झाला आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशिकांत इंगळे, एम.आर.दुसाने हे प्रशासनाच्या माध्यमातून निवडणुकीचे काम पाहत आहे.

मनधरणी ठरली अपयशी
मोंढाळा येथील प्रभाग क्रंमाक एक मधील अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी दोन्ही उमेदवारांपैकी एकाने माघार घ्यावी यासाठी अनेकांनी दोघांची मनधरणी केली मात्र दोन्ही उमेदवार आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने येथील पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी रविवार, 27 रोजी मतदान होणार आहे.