मोकाट कुत्र्यांनी नऊ जणांना घेतला चावा

0

जळगाव । शहरात सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, आज रविवारी या मोकाट कुत्र्यांनी तब्बल नऊ जणांवर हल्ला करत चावा घेतला. जखमींत वृध्दासह लहान मुले व महिलांचाही समावेश असून, त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरासह परिसरात काही दिवसांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री-अपरात्री व दिवसाही या कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा तर आपसांत झोंबाझोंबी करत ही कुत्री रस्त्याने इकडून तिकडे पळताना दिसतात. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन अनेकांना जायबंदीही व्हावे लागले आहे.

रस्त्याने जाणार्‍या नागरिकांवर धावून येतात मोकाट कुत्रे
रस्त्याने जाणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जात त्यांना चावाही घेतला जात होता. आज तर शहरात विविध ठिकाणी 9 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. सर्व 9 जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये रूक्मिणी लक्ष्मण सिंग्टे (वय 65 रा. शिवाजीनगर), अरूणा राजेश चव्हाण (वय 38 रा. सम्राट कॉलनी), शबाना बी मुस्ताक अली (वय 04 रा. गेंदालालमिल), शरीया मोहम्मद रफीक ( वय 06, रा.गेंदालाल मिल), हितेेश प्रल्हाद वारूळे (वय- साडेतीन वर्ष रा. खोटेनगर), ईसाल रेवेलसिंग भिलाला (वय 06 रा.पाल), प्रदिप सुरसिंग पाटील ( वय 40 रा. पिंप्राळा), नामदेव मोतीराम जाधव ( वय 51 रा.कुसुंबा), शामकांत गुजर ( वय 40 रा. निमखेडी) यांचा समावेश आहे. या मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास लक्षात घेता महापालिका प्रशासनाने त्वरित त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.