मोखाडा – मोखाडा तालूक्यात मनरेगा अंतर्गत दगडी बांध, खाचरं आदि ठिकाणी काम केलेल्या मजूरांचे पगार प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. जॉबकार्ड व खातेनंबरच्या फेरबदलामूळे प्रस्तूतचे पगार रखडलेले असून रोजगार सेवकांच्या हलगर्जीपणामूळे मजूरांना पगारापासून वंचित रहावे लागलेले आहे. मोखाडा तालूक्यातील वाघ्याचीवाडी, हट्टीपाडा, कोचाळे आणि खोडाळा येथील मजूरांचे पगार हे मनरेगाच्या शेवटच्या टप्प्यापासून रखडलेले आहेत. काही ठिकाणी दुबार जॉबकार्ड तर काही ठिकाणी खातेनंबरची अडचण उद्भवल्याने मजूरांचे पगार झाले नसल्याचे मोखाडा तहसीलच्या रोहयो विभागाकडून स्पष्ठ करण्यांत आले आहे. तसेच अशा प्रकारे रखडलेल्या पगारांचे हजेरी पत्रक क्रमांक आणि आधारकार्ड व जॉबकार्ड घेवून आल्यास वंचित मजूरांचे पगार काढणे सुलभ होणार असल्याचे रोहयो विभागाकडून सांगण्यांत आलेले आहे.
स्थानिक यंत्रणेचा हलगर्जीपणा
संबंधीत ठिकाणचे रोजगार सेवक आणि स्थानिक यंत्रणेने मजूरांच्या कृत्रीमरित्या थकलेल्या पगाराबाबत कोणतीही काळजी न घेतल्याने अगदी हातावर प्रपंच असलेल्या आदिवासी मजूरांचे पगार थकले आहेत. त्यामूळे मजूरांना पगारासाठी विनाकारण दिशाहिन हेलपाटे मारावे लागत आहेत. तालूका कृषी अधिकारी कार्यालयाने याबाबत तातडीने दखल घेवून मजूरांना पगार अदा करण्याची तजविज करावी अशी मागणी हट्टीपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते रघूनाथ झुगरे यांनी केली आहे.