मोखाडा । मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायत हद्दीतील शिरसोनपाडा येथील एकनाथ बाळू मालक (3)या कुपोषीत बालकाचा 27 जानेवारीरोजी पहाटे मृत्यू झाला आहे.या बालमृत्यूमुळे एकूणच व्यवस्थेची अब्रू पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदार संघातील मोखाडा तालुका हा कुपोषणा बाबत नेहमीच संवेदनशिल राहिलेला आहे. सन 2016-17 या एकाच वर्षात एकूण 63 बालमृत्यू झालेले आहेत.तर सन 2013 ते सन 2017 दरम्यानच्या चार वर्षात 222 बालमृत्यू झालेले आहेत.दरवर्षीच्या बालमृत्यूंचा आकडा तपासला तर प्रत्येक वर्षी 50 ते 70 च्या दरम्यान बालमृत्यू होत आहेत.त्यामूळे एकूणच नवसंजीवणी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दस्तूरखुद्द आदिवासी विकास मंत्र्यांच्या मतदार संघात आणि विशेषतः निवासस्थानाला खेटून असलेल्या मोखाडा तालुक्यात संपूर्ण नवसंजिवनी योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. सन 2015-16 मध्ये एकाच वर्षात 70 बालमृत्यू तर एकट्या जुलै महिन्यात 12 बालकांचे सलग बळी गेल्यानंतर विरोधीपक्षाने मोठा टाहो फोडून सत्ताधार्यांचा निषेध नोंदवला होता.तर सत्ताधार्यांनीही आश्वासनांचे गाजर दाखवित कुपोषीत बालकांच्या कुटूंबीयांच्या दुःखावर फुंकर मारण्याच्या दुबळा प्रयत्न केला होता.तथापी एकूणच नजरबंद धुळफेकी उपरांतही सन 15-16 तील कुपोषीत बालमृत्यूंचा आकडा मागील दोन वर्षांच्या पटीत 27 ने वाढलेला होता. तालुक्यातील 229 अंगणवाडी केंद्रांमधील कुपोषीत बालकांचा आकडा 8324 इतक्या मोठ्या संख्येने फुगलेला असून त्यापैकी 475 इतकी अवाढव्य कुपोषीत बालके आजही मृत्यूच्या दाढेत आहेत.नवसंजिवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या बालकांचे भवितव्यही सध्या धोक्यातच असल्याची टिका श्रमजीवी संघटणेचे सचिव पांडू मालक यांनी केली आहे.
मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र गेले कुठे ?
मागील दोन वर्षापूर्वी मौजे खोच येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झालेले आहे.तथापी दोन वर्षाचा अवधी उलटला तरीही येथील उपकेंद्राच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही.खोच – शिरसोनपाडा हा भाग कुपोषणा बाबत अत्यंत संवेदनाक्षम आहे.असे असतांनाही या भागातील आरोग्य सुविधेबाबत कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे येथील सरपंच तथा श्रमजीवी संघटनेचे सचिव पांडू मालक यांनी सांगीतले असून एकूनच दुर्व्यवस्थेबाबत तीव्र लढा उभारण्याचे सुतोवाच केले आहे.