मोखाड्यातील शेतकरी पिकविम्यापासून वंचित

0

मोखाडा (दीपक गायकवाड) : प्रधानमंत्री पिकविमा योजना 2017 अंतर्गत शेतकर्‍यांचे पीकविमा उतरविण्याचे काम सुरू आहे. 31 जुलै पर्यंत असलेली मुदत 5 ऑगष्टपर्यंत वाढविण्यांत आलेली आहे. परंतू अतिदुर्गम भाग आणि तांत्रीक अडचणींमूळे मोखाडा तालूक्यातील शेकडो शेतकरी पिकविम्यापासून वंचित रहाणार असल्याने शासनाने पिकविमा हफ्ता भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी तालूक्यातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे. मोखाडा तालूक्यातून दि.31 जुलै अखेर खुद्द मोखाडा विभागातून बिगर कर्जदार शेतकरी 116 व कर्जदार शेतकरी 178 तर खोडाळा विभागातून बिगर कर्जदार शेतकरी 306 व कर्जदार शेतकरी 68 ईतक्या शेतकर्‍यांना दि.31 जुलै अखेर पिक विमा योजनेचा लाभ घेता आलेला आहे. मात्र दि.31 जुलै अखेरची नियत मुदत संपल्यानंतर दि.5 ऑगष्ट पर्यंत वाढलेल्या मुदतीचे हफ्ते जमा करून घेण्यास सहकारी बँकेने व आयडीबीआय बँकेने नकार दिल्याने मोखाडा तालूक्यातील शेकडो आदिवासी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी पिकविम्यापासून वंचित रहाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजून मुदतवाढ देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी पालघर तसेच नॅशनल विमा एजंसीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.

जिल्हा प्रशासनाने झटकले हात
प्रधानमंत्री विमा योजणा सन 2017 साठी अत्यंत अल्प दरात शेतकर्‍यांच्या पिकांचे विमे उतरविले जात आहेत. कर्जदार शेतकर्‍यांच्या विम्याचे हफ्ते परस्पर पीक कर्जातून कापले जात आहेत. तर बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी प्रगती प्रतिष्ठाण योजनेतून हफ्ते देण्याची तरतूद जिल्हाधिकारी पालघर यांचे मार्फत करण्यांत आली होती. परंतू त्याचेही अनुदान संपल्याचे कारण देत विमाहफ्ते थांबविल्याने अनेक लाभार्थी आजमितीस वंचित राहिलेले आहेत. मात्र जिल्हाधिकारी पालघर यांचेशी संपर्क होवू न शकल्याने अनूदानाच्या उपलब्धतेबाबत स्पष्टीकरण होवू शकले नाही.

आधार लिंकींगची सुविधा नादूरूस्त
मुदतबाह्य हफ्ते स्विकारण्यास सहकारी बँकेने नकार दिल्याने शेतकर्‍यांच्या अडचणींत प्रचंड वाढ झाली आहे. महा ई सेवा केंद्राकडील आधार लिंकींग सुविधा नादूरूस्त झाल्याने तालुक्यातील निष्कांचन शेतकर्यांना आधार लिंकींगसाठी 40 किमी पुढे जव्हार येथे जावे लागल्याने अनेक शेतकर्यांना हक्काच्या पिकविम्याला मुकवे लागले आहे. तर आत्ता 5 ऑगष्टची मुदतही 1 दिवसावर आल्याने शेतकर्‍यांनी करायचे काय असा यक्ष प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. मोखाडा तालूक्यातील भौगोलीक परिस्थिती आणि तांत्रीक अडचणी लक्षात घेवून जिल्हाधिकारी पालघर यांनी पिकविमा हफ्त्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

पिक विमा काढण्यासाठी शासनाने आम्हा शेतकर्‍यांना उद्यूक्त केले आहे. परंतू पिकविमा काढण्यासाठी आधार लिंकींग, ऑनलाईन फॉर्म भरने आदि अडथळे उभे केल्याने आम्ही हक्काच्या पिकविमा संरक्षणापासून वंचित राहिलो आहोत.
– गणेश भोरू दोंदे, शेतकरी,खोडाळा

एकीकडे अनेक अडथळे पार करून ऑनलाईनपर्यंत पोहोचलो तर तीही सुविधा जव्हार मोखाड्यात बंद असल्याने माझ्यासारखे शेकडो शेतकरी पिकविम्याला पारखे झालेलो आहोत. शासनाने शेतक-यांची निकड लक्षात घेवून तातडीने तजविज करावी.
– हरीश्चंद्र पांडूरंग ठोमरे, शेतकरी,आडोशी

तालूक्यात सर्वत्र नेटचा प्रॉब्लेम असल्याने सर्व्हर डाऊन असून पिकविम्याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास अडचण येत आहे. तसेच बिगर शेतकर्‍यांचे अनूदान उपलब्ध नसल्याने अनेक शेतकरी विन्मूख जात असल्याचे वाणी यांनी सांगीतले आहे.
– बी.बी.वाणी, तालूका कृषी अधिकारी