मोखाडा : तालूक्यात सर्वत्र सन 1972 साली महाराष्ट्र राज्य विजमंडळाने दर्या खोर्यातून लाईन टाकून विद्यूत पुरवठा सुरू केलेला आहे. तथापी आजतागायत किरकोळ दुरूस्ती ऐवजी कोणतीही देखभाल दुरूस्ती करण्यांत आलेली नाही. त्यामूळे वारंवार विद्यूत पुरवठा खंडीत होत असून व्यापारी वर्गासह, कार्यालये आणि सरकारी दवाखाण्यांना त्याचा कमालीचा त्रास होत आहे. एकीकडे जुनाट विद्यूत वाहिन्या आणि सडलेल्या पोलमुळे हलक्याशा पावसातही वारंवार आणि सलगपणे विद्यूतपूरवठा खंडीत होत असतांना दुसरीरडे मात्र महावितरणकडे कर्मचार्यांसह अधिकार्यांचाही मोठ्या प्रमाणावर अनूशेष आहे.
उपअभियंत्यांसह सहाय्यक अभियंत्यांची तीन पदे रिक्त
आजमितीस मोखाडा महावितरणकडे उपअभियंत्यांसह सहाय्यक अभियंत्यांची तीन पदे रिक्त आहेत तर लाईनमनची एकही पोष्ट भरलेली नाही. तसेच प्रत्यक्ष रानावनांत काम करणार्या वायरमनच्या 12 जागा रिक्त आहेत. त्यामूळे विद्यूत पुरवठा खंडीत झाला की प्रत्यक्षात पून्हा सुरू होण्यायासाठी मोखाडा तालूक्यातील जनतेला प्रदीर्घ काळ वाट पहावी लागते. त्यातच मोखाड्यातील मौजे आम्ले, केवनाळे, कुर्लोद, काष्टी, सावर्डे या अतिदुर्गम आणि बेटांवरील गावांचा विद्यूत पुरवठा पावसाळ्यात खंडीत झाला तर केवळ जंगलपट्टीमूळे थेट दिवाळीनंतरच येथील आदिवासी जनतेला प्रकाशवाट दाखविण्याचे औदार्य महावितरण कडून दाखविले जात असल्याची वास्तविक शोकांतिका आहे.
100 रूपयांच्या देयकासाठी आदिवासींना 300 रूपयांचा फटका
जिल्ह्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने विद्यूत देयके भरणा करून घेण्यास नकार दिल्याने महावितरण अधिकार्यांच्या सांगण्यावरून ऐटोमैक्स एजंसीच्या नांवे भरणा केला होता. परंतू प्रस्तूत एजंसीने कोट्यावधी रूपयांचा चुना लावून पोबारा केल्याने मोखाडा तालूक्यातून असंख्य लोकांची लाखोंनी फसवणूक झाली. त्यातच खोडाळा विभागातील देयके मोखाडा येथे पूढे 20 किमी जावून भरावी लागत असल्याने आदिवासी मजूरांना केवळ 100 रूपयांच्या देयकांसाठीही 200 रूपयांचा रोजगार बुडवून भाडे खर्चून मोखाडा येथे जावे लागत आहे.