वाकड : रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी थांबलेल्या मोटार चालकाला लुटून महत्वाची कागदपत्रे आणि मोटार जबरदस्तीने नेली. हा प्रकार कात्रज देहूरोड बायपास रोडवर बावधन येथील चांदणी चौकाजवळ गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास घडला. संतोष कुमार शिंदे (वय 24, रा. नवी सांगवी, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लघुशंकेस उतरला आणि…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी त्यांची कार (एम एच 14 / जी डी 5984) हिंजवडी येथील एका खाजगी कंपनीला लावली आहे. त्या कारवर शिंदे स्वतः चालक म्हणून काम करतात. आज पहाटे शिंदे कंपनीतील कर्मचा-यांना आणण्यासाठी जात होते. कात्रज देहूरोड बायपास रोडवर चांदणी चौकाजवळ आले असता ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी अज्ञात दोघेजण कारमधून त्यांच्याजवळ आले. दोघांनी मिळून शिंदे यांना दमदाटी करून त्यांच्याजवळ असलेले बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड, महत्वाची कागदपत्रे आणि कार असा एकूण 8 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून घेऊन गेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. एन. निकम तपास करीत आहेत.