जळगाव। पत्नीच्या गळ्यातील मंगलपोत चोरटा ओढून नेत असतांना वॉचमन असलेल्या पतीला अचानक जाग आल्याने त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वॉचमन व मोटारसायकलवरून आलेल्या दोन्ही चोरट्यांमध्ये झटापटी होवून दोघांनी वॉचमनला बेदम मारहाण केली.
यात वॉचमनच्या पायााला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी वॉचमनने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मोबाईल व रोकड नेली होती चोरून
सागर समाधान जाधव हे औद्यागिक वसाहत परिसरातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या एका कंपनीत वॉचमन म्हणून कामाला आहेत. तर कंपनीतच एका खोलीत सागर जाधव हे पत्नी दिपाली यांच्यासोबत राहतात. कंपनीचे बांधकाम सुरू असल्याने सागर यांचा मिस्तरी काम करणारा शालक अजय भाईदास सोनवणे हा देखील त्यांच्यासोबत राहत आहे. तर शनिवारी मध्यरात्री जाधव कुटूंबिय व बांधकाम मजूर वर्ग झापलेले असताना चोरट्यांनी त्या ठिकाणी येवून अजय याचा मोबाईल तर एका मजुराचे अडीच हजार रुपये चोरून नेले होते. सकाळी घटना लक्षात येताच त्यांनी परिसरात चोरट्याचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाही. त्यातच पोलिसातही तक्रार दाखल केली नाही.
बुधवारी रात्री जेवन झाल्यानंतर घरात उकाडा जाणवत असल्याने वॉचमन सागर जाधव हे पत्नी दिपाली व शालक अजय यांच्यासोबत घराबाहेर झापलेले होते. मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या पल्सरवरून तोंडाला रूमाल बांधलेले दोन चोरटे त्या ठिकाणी आले. पल्सरच्या नंबरप्लेट दिसायला नको म्हणून चोरट्यांनी कापडाने बांधून क्रमांक लपवला होता. दोघांनी कंपनीच्या परिसरात प्रवेश करत दिपाली जाधव यांच्या गळ्यातील मंगलपोत तोडून प्रयत्नात असतानाच तितक्यात सागर जाधव यांना जाग आली. त्यांनी चोर-चोर आरडा-ओरडा केली. त्यानंतर त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सागर व दोन्ही चोरट्यांमध्ये झटपट झाली. परंतू चोरट्यांनी लाकडी दांड्याने सागरच्या पायावर बेदम मारहाण केली. यात वाचमन सागर हे गंभीर जखमी झाले. हिच संधी साधत चोरट्यांनी मोटारसायकलवरून धुम ठोकली.