जळगाव । शहरातील कासमवाडीमधील चौकात मोटारसायकलला आडवून लाथ मारल्याचा जाब विचारल्यावरुन मोटारसायकलस्वाराला दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करुन मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जखमी केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी 8 वाजता गुन्हा दाखल झाला आहे. योगराज चंदन मलके (वय 24, रा. साईप्रसाद कॉलनी, रामेश्वर कॉलनी) हा मोटारसायकल (क्र.एमएच 19 बीआर 8898) ने जात असताना रामेश्वर कॉलनीमधील कासमवाडीतील चौकात अनिल राठोड व चामू साळुंखे (कासमवाडी) यांनी योगराज मलके यांची मोटारसायकल आडविली. त्याच्या मोटारसायकलला दोघांनी लाथ मारली. मोटारसायकलला लाथ का मारली? याबाबत जाब विचारला असता अनिल राठोड याने तीक्ष्ण हत्याराने डाव्या गालावर वार करुन जखमी केले. तसेच चामू साळुंखे याने शिवीगाळ व दमदाटी करुन मारहाण केली. तपास हेड कॉनस्टेबल संजय भोई करीत आहेत.