मोटारसायकल अपघातात तरुण ठार

0

एरंडोल । येथून जवळच असलेल्या टहाकळी रोडवर झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाल्याची घटना काल रात्री घडली. टहाकळी रोडवर वराड गावाच्या जवळ जयभवानी हॉटेलच्या नजीक मोटारसायकल बजाज पल्सर (विना नंबरची नविन गाडी)ने टहाकळी येथील जितेंद्र पाटील (वय 24) हा आपल्या मित्रासह 8.30 वाजेच्या सुमारास घरी परत जात होता. याच दरम्यान डंपर (क्र.एम.एच.46-एफ.3764) सोबत त्यांचा अपघात झाला. डंपरने दिलेली धडक एवढी जोरात होती की, जितेंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर असलेला त्यांचा मित्रदेखील जखमी झाला. डंपर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. त्यामुळे त्याचे नाव व इतर माहिती मिळू शकली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे डंपर सावदा येथील असल्याचे कळते. याबाबत आतापर्यंत एरंडोल पोलिसात कुठलीही नोंद नव्हती. दरम्यान, तरुणाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्रीच आणण्यात आला होता. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या अपघात प्रकरणी डंपर चालकाला अटक करण्यात आलेली नव्हती. यामुळे टहाकळी गावावर शोककळा पसरली होती. मयत जितेंद्रवर आज अंतिमसंस्कार करण्यात आले.