जळगाव । गेल्या काही महिन्यापासून जिल्ह्यात मोटारसायकली चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथक तपास करीत असतांना त्यांनी एका मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून पथकाला त्याच्याजवळून 13 मोटारसायकली मिळून आल्या आहे. तसेच पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. चंदेल यांच्या पथकातील सफौ. उत्तमसिंग पाटील, सुरेश पवार, सुभाष पाटील, निळकंठ पाटील, मंगलसिंग पाटील, अशोक चौधरी, बापू पाटील, ईश्वर सोनवणे, गफुर तडवी, इद्रीस पठाण, दर्शन ढाकणे आदींनी कारवाई केली.
जिल्ह्यात मोटारसायकली चोरीच्या घटना वाढत होत्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक दत्तात्रय कुराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या सुचनेनुसार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मोटारसायकल चोरट्याविषयी गुप्त माहिती मिळाली असता पथकाने शेंदूर्णी जंगीपूरा रोडवरील साईमंदिराजवळ सापळा रचून गणेश बाबुलाल परदेशी (रा. जंगीपुरा, ता.जामनेर) यास ताब्यात घेतले. पथकाला त्याच्याजवळ स्प्लेंडर मोटारसायकल बाळगतांना मिळून आल्याबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिली. अखेर पथकाने खाकी दाखवताच सरद मोटारसायकल ही गोदावरी मेडीकल कॉलेज येथून चोरी केल्याची कबूली दिली. यानंतर अधिक विचारपूस पथकाने केली असता त्याने साथीदार शांताराम शेनफडू सुरवाडे याच्या मदतीने धरणगाव, बोदवड, जामनेर, रावेर, धुळे, औरंगाबाद आदी शहरातून मोटारसायकली चोरी केल्याचीही कबूली दिली. दरम्यान, मोटारसायकल चोरटा गणेश परदेशी याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाला 2 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 13 मोटारसायकली काढून दिल्या असून त्या पथकाने ताब्यात घेतल्या आहे. तर पथक फरार साथीदार शांताराम सुरवाडे याचा शोध घेत आहे.