यावल । डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजच्या पार्किंगमधून मोटारसायकल चोरी प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हरिष रामचंद्र बगाळे यांची मोटारसायकल क्रं. एमएच.19.सीए.8805 ही डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेजच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मोटारसायकल चोरटा गणेश बाबुलाल परदेशी याला अटक करून नशिराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याच्याजवळून 11 मोटारसायकली मिळून आल्या होत्या. बुधवारी नशिराबाद पोलिसांनी संशयित चोरटा गणेश परदेशी याला न्यायाधीश जी.जी.कांबळे याच्या न्यायालयात हजर केले असता त्याला 1 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिस मोटरसायकल चोरट्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.