मोटारसायकल चोरी करणारी चौकडी जाळ्यात : चोरीच्या 13 दुचाकी अमळनेर पोलिसांनी केल्या जप्त

Attal thieves with 13 stolen bikes in Amalner Police Net अमळनेर : अल्प किंमतीत संशयीत दुचाकी विक्रीच्या प्रयत्नात असताना अमळनेर पोलिसांनी संशयीताच्या मुसक्या बांधल्या तर पोलिस चौकशीत संशयीतासह त्याच्या अन्य तीन साथीदारांनी जिल्ह्यातून तब्बल 13 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तिघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्यांनी अल्प किंमतीत दुचाकी खरेदी केल्या त्यांनादेखील आता आरोपी केले जाणार आहे. दीपक सुपडू बैसाणे (ताडेपुरा, अमळनेर), गोकुळ गणेश भिल (रा. जिराळी, ता.पारोळा), दशरथ भिका कोळी (रा.जैतपीर, ता.अमळनेर), गोपाळ संभाजी वानखेडे (रा.मंगरुळ, ता.अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यांनी केली कारवाई
अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, सिध्दांत शिसोदे, गणेश पाटील, निलेश मोरे आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

अल्प किंमतीत दुचाकी खरेदी न करण्याचे आवाहन
कागदपत्र नसलेल्या दुचाकींची कुणीही अल्प किंमतीत विक्री करीत असल्यास अमळनेर पोलिसांना माहिती द्यावी शिवाय अशा वाहनांची खरेदी करू नये, असे आवाहन अमळनेर पोलिसांनी केले आहे. चोरीच्या दुचाकी खरेदी करणे हा गुन्हा असल्याने अशा लोकांना आरोपी करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे म्हणाले.