सोलापूर, मुंबई, थेरगावचे आरोपी
पिंपरी-चिंचवड : गजबजलेल्या खराळवाडी परिसरात 6 नोव्हेंबरला भरदुपारी तीन तासांमध्ये दोन गाडीच्या काचा फोडून चोरट्यांनी 6 लाख 83 हजाराचा ऐवज पळवला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या रिक्षामुळे चोरट्यांचा माग लागला. या प्रकरणी चार चोरट्यांना पिंपरी पोलिसांनी मुंबई व सोलापूर परिसरातून अटक केली आहे. शंकर अशोक चव्हाण (वय 30, रा. खेड सटवाई, सोलापूर), करण मोहन सिंग (वय 25, रा. यादवनगर चिंचपाडा मुंबई), प्रकाश अशोक पवार (वय 35, रा. हनमगाव, सोलापूर), प्रमोद विजय जाधव (वय 34, रा. शिवतिर्थनगर कॉलनी, थेरगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
सीसीटीव्हीत रिक्षा कैद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी खराळवाडी परिसरात दुपारी एक ते चार या तीन तासांच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी दोन मोटारींच्या काचा फोडून त्यातील सुमारे सात लाखांचा ऐवज चोरला होता. चोरीच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये दोन्ही ठिकाणी एक रिक्षा संशयीतरित्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी रिक्षाच्या क्रमांकावरुन थेरगाव येथील रिक्षाचालक प्रमोद जाधव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याने त्याचे साथीदार शंकर व करण यांच्या सहाय्याने चोरी केल्याचे कबूल केले.
4 लाख 50 हजारांचा माल जप्त
पिंपरी पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून करणला तर शंकर व प्रकाश याला सोलापूर येथून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून दोन लाख 40 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व दुचाकी असा चार लाख 50 हजार रुपयांचा माल जप्त केला. तसेच प्रमोद व करण यांच्यावरील पिंपरी पोलीस ठाण्यातील आणखी एक चोरीचा गुन्हा उघड झाला असून त्या गुन्ह्यातील पाच हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर करत आहेत.