मोठी बातमी : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपाचा बहिष्कार : सर्व 24 उमेदवारांची माघार !

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत रंगत आली असतानाच अचानक भाजपाने सोमवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याची घोषणा करीत सर्व 24 उमेदवारांनी माघार घेतल्याची घोषणा माजी मंत्री व भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी केल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावेळी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

ऐनवेळी भाजपाचा विश्‍वासघात : आमदार राजू मामा
यासंदर्भात आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, महाविकास आघाडीचे घटकपक्ष राज्यात सत्ताधारी आहेत. या आधी जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते. आताच्या निवडणुकीसाठी अशाच प्रयत्नांमध्ये आम्ही म्हणजे भाजप सर्व पक्षांसोबत सुरुवातीपासून होतो. जागा वाटपापर्यंत सर्व चर्चा झाली होती मात्र ऐनवेळी भाजपचा अन्य पक्षांनी विश्वासघात केला आणि निवडणुकीला भाग पाडले गेले. आमची पहिल्या दिवसापासून सहकार्याचीच भूमिका होती मात्र आम्हाला गाफील ठेऊन बाकीच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या. खरे तर हे विश्वासघाती आणि सत्तेच्या लालसेने राजकारण होते. जिल्हा बँक शेतकर्‍यांची बँक आहे, असे म्हणणारे सत्तेसाठीच असे बदलले. जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने, सहकारी सूतगिरण्या, शैक्षणिक संस्था, उद्योगत आहेत. त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या अशा संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे. ही सगळी त्यांची सुरुवातीपासून स्वतःच्या विकासाची खेळी आहे. शेतकर्‍यांना नुसते ‘बनवले’ गेले आहे. त्यासाठीच या निवडणुकीतसुद्धा त्यांना जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम हवे होते. जिल्हा बँक शेतकर्‍यांची बँक आहे, असे म्हणणार्‍यांनी जिल्हा बँकेकडून किती शेतकर्‍यांचा व अन्य उद्योगांचा विकास आतापर्यंत केला ? , या प्रश्नाचे उत्तर त्यांना जनतेपुढे द्यावेच लागणार आहे त्यासाठी भाजपचे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपासून, पंचायत समित्या , नगरपरीषद, महापालिका, जिल्हा परीषद, आमदार, खासदार असे सर्वच लोकप्रतिनिधी त्यांना पुढच्या काळात जाब विचारतील, असेही ते म्हणाले.

भाजपाच्या माघारीनंतर अनेक तर्क-वितर्क
भाजपाने अचानक निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना ऊत आला आहे. सर्वपक्षीय पॅनलमधून भाजपा बाहेर पडल्यानंतर स्वतंत्र लढण्याची घोषणा भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली हेाती. भाजपाच्या खासदार आमदारांसह सहा दिग्गजांचे अ र्ज निवडणुकीतून बाद झाल्यानंतर भाजपाने त्या विरोधात अपिलही केले मात्र त्यातही दिलासा मिळू शकला नाही. माजी मंत्री महाजन यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असता सोमवारी अचानक निवडणुकीत माघार घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.