मोठी बातमी : जिल्हा दुध संघाची निवडणूक प्रक्रिया स्थगित

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी राजकीय आखाडा तापला असतानाच राज्यात सुरू असलेल्या सहकारी संस्थांच्या तसेच ग्रामपंचायत निवडणुका पाहता राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याने जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणूक लांबणीवर पडली आहे. दरम्यान या निवडणुकीबाबत पुढील निर्णय 20 डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे.

आखाडा तापला असतानाच धडकला निर्णय
जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत असताना निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला आहे. सोमवार, 28 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी अंतीम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप करण्यात आले मात्र हे सर्व सुरू असतानाच राज्यात होवून घातलेल्या सात हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असल्याने या कालावधीमध्ये मतदारांनी निवडणुकीत सहभाग जास्तीत जास्त नोंदविण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात वर्ग क वर्ग ड तसेच वर्ग ई प्रकारच्या सहकारी संस्था त्याचप्रमाणे ज्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणूक घेण्याचे प्रादेशिक केलेले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.

मतदान प्रक्रिया 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली
या आदेशानुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघाचादेखील समावेश आहे त्यामुळे मंगळवार, 29 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या 40 उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. आता येथून पुढची मतदानाची प्रक्रिया ही 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश विशेष कार्य अधिकारी व सहनिबंधक सहकारी संस्थेचे श्रीकृष्ण वाडेकर यांनी काढले आहेत.