नवापूर । तालुक्यातील मोठे कडवान येथील स्वस्त धान्य दुकानास नवापूर येथील पुरवठा विभागाकडून कमी प्रमाणात धान्य पुरवठा केल्याने येथील एकूण 238 शिधापत्रिकाधारक शासनाकडून मिळणार्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत येथील स्वस्त धान्य दुकानात कमी प्रमाणात धान्य पुरविले आहे. याबाबत ग्राम दक्षता समितीकडून तहसीलदार यांच्याकडे उर्वरित धान्य मिळावे, अशी मागणी केली आहे. आपल्याला हक्काचे धान्य मिळावे म्हणून येथील ग्रामस्थांनी सरपंच यांच्यापुढे सामाजिक अंतर राखून गार्हाणे मांडले.
तालुक्यातील मोठे कडवान येथील स्वस्त धान्य दुकानात एप्रिल महिन्यासाठी निम्म्यापेक्षाही कमी प्रमाणात धान्यपुरवठा करण्यात आला. त्यात तांदूळ 2 हजार 150 किलो, गहू 1 हजार 500 किलो व साखर फक्त 30 किलो पुरविण्यात आली. येथील रेशन दुकानात 385 शिधापत्रिकाधारक आहेत. दुकानात पुरवलेला साठा हा अत्यल्प असल्याने सर्व शिधापत्रिकाधारकांना पुरविणे शक्य नाही. कमी प्रमाणात धान्य उपलब्ध झाल्यामुळे उर्वरित धान्य मिळावे यासाठी गावाचे सरपंच बंधू पाच्या वळवी व रेशन दुकानदार आर.एम.वळवी यांनी पुरवठा विभागात विचारणा केल्यावर त्यांनी तसा अर्ज करण्यास सांगितले. मात्र, पुरवठा विभागात धान्य मिळण्याबाबत अर्ज करून व पाचवेळा फेर्या मारूनही स्वस्त धान्य दुकानास उर्वरित धान्य उपलब्ध करून दिले नाही.
उर्वरित कार्डधारकांना नियमित धान्य द्या
मिळालेल्या धान्यातून येथील स्वस्त धान्य दुकाना मार्फत 385 शिधापत्रिकाधारकांना पैकी फक्त 147 शिधापत्रिकाधारकांनाच धान्य मिळाले. उर्वरित 238 शिधापत्रिकाधारकांना नियमित धान्य मिळाले नाही. वारंवार नवापूर पुरवठा विभागात मागणी करूनही धान्य उपलब्ध करून दिले जात नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मोठे कडवान येथील ग्रामस्थांनी आपली कैफियत मांडण्यासाठी सरपंच तथा ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष बंधुभावाच्या गावित यांच्याकडे आपले गार्हाणे मांडले.उर्वरित कार्डधारकांना नियमित धान्य मिळावे, अशी मागणी केली.
त्याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 हजार 407 लाभार्थी आहेत. त्यांना 7 हजार 35 किलो धान्य पुरवणे अपेक्षित असताना पुरवठा विभागाकडून फक्त 5 हजार 600 किलो धान्य पुरविले आहे. दक्षता समितीने निदर्शनास आणून दिल्याने उर्वरित 1 हजार 435 किलो धान्य मंगळवारी पुरवठा करण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, 238 शिधापत्रिकाधारकांना नियमित देण्यात येणारे धान्य मात्र अद्याप दिले नसल्याने लाभार्थी वंचित आहेत.