मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या; हत्येनंतर हातपाय बांधून टाकले विहिरीत

0

जामनेर:- तालुक्यातील बेटावद खुर्द येथील दोन भावाच्या वादाचे पर्यावसन हत्येत होवून मोठ्या भावाच्या हातून लहान भावाची शेतीच्या वादातून हत्या घडल्याची घटना आज दिनांक 4 रोजी उघडकीस आली. या घटनतील संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर असे की, बेटावद खुर्द येथील रणजित प्रताप राजपूत(मचे) व धनराज प्रताप राजपूत(मचे) हे दोघ भाऊ आपल्या कुटुंबासह गावात राहून मालकीची तीन एकर कोरडवाहू शेती करतात. दरम्यान सोमवारपासून मयत धनराज (वय-38)हा बेपत्ता होता.त्यानंतर आज बुधवारी त्याचा म्रुतदेह बेटावद बुद्रुक शिवारातील राजेंद्र पाटील यांच्या शेतातील विहीरीत तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करत घटने विषयी माहिती घेत तपास करून मयताचा मोठा भाऊ रणजीत यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. मयताची पत्नी मनीषा राजपूत यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनमध्ये संशयित रणजित राजपूत विरोधात कलम 302,201,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. मयत धनराजच्या पश्चात आई पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

घटनास्थळी श्वानपथकाकडून तपासणी

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे, रमेश कुमावत,जयसिंग राठोड,सचिन पाटील यांनी भेट दिली. याठिकाणी श्वानपथका व ठसे तज्ञांकडुन पाहणी करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे करत आहे. या दोन भावामध्ये शेतीचा वाद एवढा विकोपाला जावून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या करून त्याचे हातपाय दोरीने बांंधून विहीरीत टाकून दिले. या घटनेची चर्चा बेटावद गावासह परिसरात सुरू होती.