मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी हागणदारीमुक्त होईल

0

मुंबई। जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये हागणदारीमुक्तीसाठी अतिशय वेगाने कामे सुरु आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 19 लाख शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून देशातील मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्वात आधी हागणदारी मुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.यावेळी हागणदारी मुक्त अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जळगावचे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले.

राज्यातील 33 ग्रामपंचायतींचा करण्यात आला गौरव
दरवाजा बंद माध्यम अभियानाचा शुभारंभ तसेच हागणदारीमुक्त 11 जिल्हे व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या राज्यातील 33 ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय स्वच्छता मंत्री नरेंद्रसिंह तोमर, अभिनेते अमिताभ बच्चन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सुमित मल्लिक, परमेश्वरन अय्यर, राजेशकुमार यांच्यासह राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.

स्वच्छता अभियानाशी जुळणे भाग्याचे – बच्चन
अमिताभ बच्चन म्हणाले कि, स्वच्छता अभियानाशी जोडले जाणे ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. जनजागृतीसाठी माझा चेहरा व आवाज उपयोगात येत असेल तर तो जरूर वापरावा, असे सांगून त्यांनी दरवाजा बंद अभियानाची संकल्पना स्पष्ट केली. जे उघड्यावर शौचविधी करतात त्यांनी शौचालयाचा वापर करावा. यासाठी शौचालयाचा दरवाजा बंद करुन त्याचा वापर करावा व रोगराई टाळावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

19लाख शौचालये बांधली
मुख्यमंत्री म्हणाले कि, उघड्यावर शौचाला प्रतिबंध म्हणून केंद्र शासनामार्फत दरवाजा बंद माध्यम अभियान सुरु करण्यात येत आहे. महाराष्ट्रात स्वच्छता अभियानासाठी सर्वजण अतिशय मेहनतीने काम करीत असून राज्यात मागील एका वर्षात 19 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. 16 हजार गावे हागणदारीमुक्त झाली असून हे प्रमाण देशातील हागणदारीमुक्त गावांच्या 18 टक्के इतके आहे.

यशोगाथा पुस्तकाचे प्रकाशन

यावेळी दरवाजा बंद माध्यम अभियानाच्या पोस्टर्सचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या अभियानाच्या जनजागृतीसाठी अमिताभ बच्चन व अनुष्का शर्मा यांनी अभिनय केलेल्या जाहीरातींचे यावेळी लाँचिंग करण्यात आले. तसेच ग्रामविकास विभागाच्या बचतगट चळवळीची माहिती देणार्‍या क्यूआर कोडवर आधारीत ‘यशोगाथा’ या पुस्तकाचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.यावेळी हागणदारी मुक्त अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकार्‍यांना सन्मानित करण्यात आले. त्यात जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असतांना संपूर्ण ठाणे जिल्हा हागणदारी मुक्त केल्या बद्दल सन्मानित करण्यात आले.