मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्राची मुहूर्तमेढ जळगावातून

0

जळगाव । महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून या अभियानाची मुहूर्तमेढ आज जळगावात रोवली जात आहे याचा सार्थ अभिमान आहे. या अभियानाच्या माध्यमातून अंधाना दृष्टि देण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरातंर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन येथील जिल्हा समान्य रुगणालयाच्या आवारात मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई पाटील, महापौर ललीत कोल्हे, नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप, प्रसिध्द नेत्रशल्य चिकित्सक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कलमापूरकर, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, रामेश्‍वर नाईक आदि उपस्थित होते.

अंदाजे 17 लाखापर्यंत मोतीबिंदूचे रुग्ण
राज्यात अनेक ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये येणार्‍या 1 लाख रुग्णांमध्ये किमान 30 हजार रुग्ण हे डोळयाच्या आजारांचे असल्याचे निदर्शनास आले. ही बाब मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी तात्काळ मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या माध्यमातून आज जळगाव येथे या अभियानाचा शुभारंभ होत आहे. आजच्या शिबिराचे सर्वात मोठे योगदान हे पद्मश्री डॉ. लहाने आणि त्यांच्या टिमचे असल्याचे गौरोवोद्गार मंत्री ना. महाजन यांनी यावेळी व्यक्त केले. राज्यात अंदाजे 17 लाखापर्यंत मोतीबिंदूचे रुग्ण आहे.

राज्यात विविध भागात आयोजन होणार
राज्याच्या विविध भागात अशाप्रकारच्या शिबिरांचे आयोजन करुन या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. आणि आवश्यकता भासेल त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येवून 15 ऑगस्ट 2019 पर्यत संपूर्ण महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त करण्यात येणार आहे. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करतांना मंत्री महाजन म्हणाले की, राज्यातील ज्या व्यक्तीची उपचार करण्याची आर्थिक परिस्थिती नसेल अशा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या, त्यावर मोफत उपचार करुन गरज भासेल तशी मोफत शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. यासाठी विविध सामाजिक संस्थांची मदत होत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याची सुविधा नसल्यास अशा रुग्णांना मुंबई, पुणे येथे नेण्यात येवून तेथील राहणे, जेवण सर्व खर्च मोफत करण्यात येणार आहे. रुग्णांना बरे करुन त्यांच्या घरापर्यंत सोडण्यासाठी शासन आपल्या पाठिशी राहिल असे आश्‍वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.

ना. महाजन 38 पॅथीचे डॉक्टर – पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने
मंत्री गिरीष महाजन यांनी आरोग्य सेवेचे व्रत हाती घेतले आहे. ते राज्यातील नागरीकांसाठी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत उपलब्ध करुन देत आहे. वैद्यकीय क्षेत्रात विविध 38 पॅथी आहे. यानुसार प्रत्येक डॉक्टर हा शक्यतो एका विशिष्ट आजरात तज्ज्ञ असतो. परंतु ना. गिरीष महाजन यांचे आरोग्य क्षेत्रातील काम बघितल्यावर असे वाटते की, ना. महाजन हे असे व्यक्तीमत्व आहे की, ते या सर्व 38 पॅथींचे डॉक्टर आहेत, असे गौरोवोद्वार पद्मश्री डॉ. लहाने यांनी काढले. त्याचबरोबर आजच्या शिबिरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आमच्या टीमकडून तपासणी करण्यात येणार असून ज्यांचेवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्यांचेवर उद्यापासून शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही डॉ. लहाने यांनी सांगितले.

2 हजार रुग्णांची तपासणी होणार
यावेळी डॉ. लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी प्रातिनिधिक स्वरुपात काही रुग्णांची डोळे तपासणी करुन या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रामेश्‍वर नाईक यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजनामागील भूमिका विशद करतांना सांगितले की, या शिबिरात 2 हजार रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असलेल्या किमान 1200 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिरासाठी आलेल्या सर्व रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांची जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जैन एरिगेशन यांच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर या शिबिराच्या आयोजनासाठी लागणार्‍या विविध सुविधाकरीता एल. के. फाउंडेशन, जी. एम. फाउंडेशन यांच्यासह विविध सामाजिक संस्थाचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पितांबर भावसार यांनी तर उपस्थितांचे आभार अरविंद देशमुख यांनी मानले.