कडूस : पुणे जिल्ह्यातील सन 2016 मधील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे निवड करण्यात आली. खेड तालुक्यातुन मोती चौक गणेशोत्सव मंडळाची निवड होऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. कोल्हापुर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार मंडळास प्रदान करण्यात आला. पुणे येथील चव्हाणनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक होते. याप्रसंगी राजगुरूनगरचे सुपुत्र व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले व तेजस्वी सातपुते यांची विशेष उपस्थिती होती.
मंडळाचे 124 वे वर्ष
लोकमान्य टिळकांनी 1894 साली या मंडळाची स्थापना केलेली आहे. मंडळाचे सध्या 124 वे वर्ष चालू असून पुढील वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात मंडळ पदार्पण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंडळास पुरस्कार मिळाल्यामुळे परिसरातून सर्वांचे कौतुक होत आहे.
हे यश मंडळाच्या सर्व लहान थोर कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे मिळाले आहे. ही मनस्वी अभिमानास्पद गोष्ट असून पुढील वर्ष आमच्या चौकासाठी अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. नवीन उत्साहाने पुढील कार्य करू. पुढच्या वर्षीचाही पुरस्कार मिळवून संस्मरणीय परंपरा कायम ठेवू अशी भावना मंडळाचे अध्यक्ष मनोज सावताडकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज सावताडकर, पदाधिकारी अमित मराठे, मंदार खाडे, कैवल्य वाघोलीकर हे उपस्थित होते.