पुणे । जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील कालव (शिंपले) आणि मोती शेतीसाठी जिल्ह्यातील 25 शेतकर्यांना प्रशिक्षण कार्यशाळेसाठी ओरिसा राज्यातील भुवनेश्वर येथील सेंट्रल इन्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर अॅक्वाकल्चर याठिकाणी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत 75 टक्के अनुदानावर मोती शेती प्रक्रिया आणि प्रशिक्षण ही नाविन्यपूर्ण योजना सन 2017-18 या वर्षात प्रस्तावित केली आहे. गोड्या पाण्यातील कालव (शिंपले) आणि मोती शेतीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहीत करून त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 6, बारामतीमधील 3, दौंड आणि शिरूर येथील प्रत्येकी 5, वेल्हे येथील 3 आणि इंदापूरमधील 2 अशा एकूण 25 शेतकर्यांची निवड करण्यात आली. या 25 शेतकर्यांना ओरिसा येथील सीफा-सेंट्रल इन्स्टिट्युट ऑफ फ्रेशवॉटर अॅक्वाकल्चर याठिकाणी 17 ते 22 जानेवारी दरम्यान होणार्या मोती शेती प्रशिक्षणकरीता पाठविण्यात आले आहे. सध्या मोती शेती याकडे चांगला कल वाढत असून, बाजारात मोतीला मोठी मागणी आहे. या प्रशिक्षणामुळे शेतकर्यांना पूरक व्यवसाय निर्माण होणार असून, त्यांची आर्थिक उन्नती होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.