भाजप मंडळ अध्यक्षांच्या घरी चोरी; निवडणूक प्रचाराचे साहित्य तसेच सोडून लांबविले घरातील पाच हजाराची रोकड !
जळगाव – गेल्या दोन दिवसांपासून अयोध्यानगरातील भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप रामकृष्ण रोटे यांच्या घराकडे दुचाकीवरुन चोरट्यांची रेकी सुरु होती. खोक्यातून प्रचाराचे साहित्य आले. मात्र निवडणुकीत वाटण्यासाठी पैसे आले असावेत, मोठा माल हाती लागेल या अपेक्षेने चोरट्यांनी मध्यरात्री रोटे यांच्या घरी डल्ला मारला. कुलूप तोडून घरात घुसल्यावर खोके उघडले. मात्र त्यातील निवडणुकीसाठीचे प्रचाराचे साहित्य म्हणजेच मोदींचे मास्क, टिशर्ट पाहून चोरटे दचकले अन् डोक्याला हात मारला. रिकामे हाते परतण्यापेक्षा चोरट्यांनी कपाटातील पाच हजार लांबविण्यात धन्यता मानली.
अयोध्यानगरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. याच परिसरात प्रदीप रोटे यांच्या घरानंतर चोरट्यांनी अशोक नगरातील ठेकेदार अशोक पुलचंद जैस्वाल यांचेही बंद घर फोडले. कपाटाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 60 ते 70 हजाराची रोकड व दागिणे असा अडीच ते तीन लाखांचा मुद्देमाल लांबविला आहे. या घटनांनी रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांसह श्वान पथक, ठसे तज्ञांनी पाहणी केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे.