मुंबई | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी ६७ वा वाढदिवस आहे. त्यांचा हा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. उद्या मोदींच्या हस्ते गुजराथ येथे ११२२३ दिव्यांगांना ११ कोटी रूपयांची आवश्यक विशेष उपकरणे वाटली जाणार आहेत. या रेकॉर्डची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उद्या देशभरातील भाजप कार्यकर्ते स्वच्छता अभियान राबविणार असून अध्यक्ष अमित शहा तेलंगणातील स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी रविवारी अहमदाबादमध्ये सर्वप्रथम आई हिराबा यांचे आशीर्वाद घेणार आहेत. नंतर ते संपूर्ण दिवस नवसारीतील आदिवासींसोबत घालविणार आहेत. भाजप युवा मोर्चातर्फे १७ व १८ सप्टेंबर रोजी देशभरातील प्रमुख बाजार, चौक, मोठे मॉल येथे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉलवर नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करण्यासाठीचे अभियान राबविले जाणार असल्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले. या अॅपवर मोदींची भाषणे, मन की बात, केंद्राने उपलब्ध केलेल्या सुविधा व नव्या योजनांची माहिती आहे.
भारतीय जनता पार्टीचे देशभरातील सर्व खासदार आणि आमदार रविवारी हॉस्पिटल, बस स्टॅंड, तलाव, शाळा, महापुरूषांचे पुतळे, गार्डन, समाज भवन येथे स्वच्छता मोहीम राबवतील. तसेच, वॉर्ड स्तरावर आणि झोपडपट्टी भागात मेडीकल कॅम्प लावले जाणार आहेत.
मोदींवर टीका नाही!
गुजरातमधील भाजपचा एक कार्यकर्ता, प्रकाश गुर्जर हा मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोकांकडून अर्ज भरुन घेत आहे. या अर्जाच्या माध्यमातून लोकांकडून सरकारवर टीका करणार नाही, अशी हमी घेतली जात आहे. या निमित्ताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नाव सामील करून घेण्याचा प्रकाश गुर्जरचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी संकल्प पत्र तयार केले आहे. अनेक संकल्पांचा उल्लेख या अर्जात करण्यात आला आहे. यामध्ये कचरा कचराकुंडीतच टाकावा, देश स्वच्छ ठेवावा अशा काही संकल्पांचा समावेश आहे. याशिवाय प्रशासन आणि सरकारवर केव्हाही टीका करणार नाही, अशी शपथ घेण्याचे आवाहनदेखील या अर्जातून करण्यात आले आहे. प्रकाश गुर्जर आणि त्यांची टीम यासाठी लोकांकडून अर्ज भरुन घेत आहे.
रविवारीही शाळा, उपस्थिती सक्तीची
उत्तर प्रदेशमधील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मोदींचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. मोदींचा स्वच्छतेचा संदेश आणि त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना यावेळी समजून सांगितले जाईल. ज्यामुळे मोदींचे ‘स्वच्छ भारता’चे स्वप्न पूर्ण होईल. शिक्षण राज्यमंत्री अनुपमा जैस्वाल यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रातील सेवा दिवस नियोजन
राज्यातील सर्व शहर आणि गावांमधल्या हॉस्पिटल, शाळा, बस स्टेशन्स, मोठया नेत्यांचे पुतळे यासारख्या सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता अभियान
झोपडपट्टी आणि दुर्गम भागात मेडिकल कॅम्पच
उपक्रम राबवताना समविचारी संघटनांची मदत
भाजपच्या वैद्यकीय विभागाने जिल्हास्तरावर किमान 2 शिबीरे
गावपातळीवर वृक्षारोपण कार्यक्रम
प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा उपक्रमांमध्ये सहभाग
राज्यसभा खासदार आणि परिषदेच्या आमदारांचे आपापल्या विभागात उपक्रम
जिल्हा आणि मंडलस्तरावर नियोजनबद्ध कार्यक्रम