मोदींची पथ ढासळली

0

जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विराट आणि दीपिका!

वॉशिंग्टन । अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने जारी केलेल्या जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली, अभिनेत्री दीपिका पादुकोण, कॅब कंपनी ओलाचे को-फाउंडर भाविश अग्रवाल आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना स्थान मिळाले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही या यादीत सामील करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की, या वेळी 45 चेहरे असे आहेत, ज्यांचे वय 40 पेक्षाही कमी आहे. मात्र या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान मिळालेले नाही.

महिलांना मिळाले जास्त स्थान
टाइम मॅगझिनकडून सांगण्यात आले की, 2018 च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सर्वात जास्त 45 असे आहेत, ज्यांचे वय 40 वर्षांहून कमी आहे. यात 14 वर्षीय अ‍ॅक्टर मिल्ली बॉबी ब्राऊनही सामील आहे. जगभरात महिलांच्या नेतृत्वातील वाढत असलेली भागिदारी पाहून मॅगझिनने या वर्षी जास्त महिला लिस्टमध्ये सामील केले. मॅगझिनने या वेळी अ‍ॅक्ट्रेस निकोल किडमन, प्रिन्स हॅरी आणि त्यांची वाग्दत्त वधू मेगन मार्कल, लंडनचे मेयर सादिक खान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, नॉर्थ कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, आयर्लंडचे पंतप्रधान लियो वराडकर, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना स्थान दिले आहे.

नरेंद्र मोदींना मात्र स्थान नाही!
आश्‍चर्य म्हणजे, या यादीत भारतातील एकाही राजकारणी व्यक्तीचा समावेश नाही. ‘टाइम’च्या गतवर्षाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नरेंद्र मोदींचा समावेश होता, मात्र यावर्षी मोदींना या यादीतून वगळण्यात आले आहे. भारतात प्रभावशाली नेता म्हणून गणल्या जाणार्‍या मोदींचा प्रभाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. उन्नाव, कठुआ, सुरत बलात्कार प्रकरण, जीएसटी, नोटाबंदी यांसारख्या अनेक कारणांमुळे देशातील वातावरण खूपच तापले आहे आणि याचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर होत असल्याचे म्हटले जात आहे.