मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. बहुमत नसल्याने आणि शिवसेनेने पाठींबा न दिल्याने भाजपाने सत्तास्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिले आहे. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतली आहे. एनडीएमधून शिवसेना बाहेर पडली आहे. केंद्रातील एकमेव मंत्रीपदाचा राजीनामा अरविंद सावंत यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेऊन राजीनामा देणार होते मात्र मोदींची भेट न झाल्याने अरविंद सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सोपविला आहे. अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग खाते होते.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मला केंद्रात मंत्रीपद मिळाले. ६ महिन्यापासून मी मंत्री म्हणून काम करतो होतो, मात्र खोट्या वातावरणात मी राहू शकत नसल्याने मी राजीनामा दिला नसल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात विश्वासार्हतेला तडा गेला. दोन्ही पक्षात काही बोलणी झालीच नाही असे सांगून भाजपने शिवसेनेला खोटे ठरविले, या घटनेने दु:खी होऊन मी राजीनामा दिला असे सावंत यांनी म्हटले आहे.