मोदींची रणनीती

0

भारताला कायम त्रासदायक ठरावे म्हणून पाकिस्तानने चीनला पाकव्याप्त काश्मीरमध्ये आर्थिक कॉरिडोरसारखे उपक्रम राबवण्यास उद्युक्त करून दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये वितुष्ठ निर्माण केले. मात्र पंतप्रधान मोदी यांनी चीनसोबत अफगाणिस्तानात विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेऊन पाकिस्तानला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे चीन व अफगाणिस्तान भारताचे मित्र बनतील आणि पाकिस्तानसाठी डोकेदुखी बनतील.

मागील दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौर्‍यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तीमत्त्व जरी भारतातील विरोधकांना आपलेसे वाटत नसले, तरी जगभरातील राष्ट्रप्रमुखांना ते हवेहवेसे वाटू लागले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी यांनी त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सुटाबुटात न जाता सदरा आणि पायजम्यावर परदेशी वार्‍या करणारे मोदी जाणीवपूर्वक प्रत्येक देशात भारतीय संस्कृतीचे ठासून दर्शन घडवून देण्याचा प्रयत्न करतात. हेच मोदी दोन वर्षांपूर्वी कुणालाही न कळवता थेट पाकिस्तानात विमान उतरवतात आणि तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतात. मोदी यांची ही भेट अनपेक्षित होती. त्याआधी दोन वर्षांपूर्वी याच मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत पाकिस्तानवर टिकास्त्र सोडली होती. मात्र वैर बाळगतांना शत्रुला अल्हाददायक आठवणी देण्याची मोदी यांची सवय आहे. त्यामुळे मोदी असे काही करतील, असे कुणालाच वाटत नव्हते, पण मोदी यांनी तसे करून सर्वांचे अंदाज फोल ठरवून टाकले. हीच रणनीती पंतपधान नरेंद्र मोदी सध्या चीनमध्ये राबवत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दीर्घकाळासाठी चीनची सत्ता आपल्याच हाती राहिल, अशी कायदेशीर तरतूद करवून घेतली आहे. त्यामुळे चीनसोबतचे जे काही बरे वाईट ठरवायचे असेल, ते शी जिंगपिंग यांच्याशिवाय आता भारताला गत्यंतर नाही. त्यामुळे डोकलामचा विषय किती ताणून ठेवायचा हा प्रश्‍न आहे. या एका विषयावरून अवघ्या चीनशी आर्थिक, सामाजिक स्तरावरही संबंध बिघडवायचे का, असा विचार करून मोदी यांनी तातडीने चीनचा दौरा आखला. या दौर्‍याचा कोणताही पूर्वनियोजित अजेंडा नाही. किंवा विषयपत्रिका, करारनामा ठरवण्यात आला नाही. केवळ मैत्रीपूर्ण, सौदाहर्यपूर्ण हा दौरा असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी कळवले आहे. मधूर वाणीतून समोरच्याच्या मनात स्थान निर्माण करून मग आपले म्हणणे मांडायचे आणि त्याला आपल्या बाजुने सकारात्मक करायचे, हे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय कुणालाही चांगले जमणारे नाही. त्यामुळे इथेही पंतप्रधान नरेंद मोदी काही ना काही ठरवून येणार, हे निश्‍चित आहे. त्याची सुरुवातही झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्यामध्ये वुहानमध्ये झालेल्या दोन दिवसीय अनौपचारिक शिखर परिषदेत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात अफगाणिस्तानसंबंधी घेतलेला निर्णयामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखू शकते. भारत आणि चीन अफगाणिस्तानमध्ये प्रथमच संयुक्त आर्थिक प्रकल्पावर एकत्र काम करणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये या प्रकल्पाबद्दल एकमत झाले आहे. भारत आणि चीनच्या या निर्णयामुळे निश्‍चितच पाकिस्तान दुखावला जाऊ शकतो. कारण अफगाणिस्तानमध्ये भारताने हस्तक्षेप करु नये, भारताचे महत्व वाढू नये असे पाकिस्तानचे मत आहे. मोदी आणि जिनपिंग यांच्यात होणार्‍या भेटीमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला होता. पाकिस्तानची हीच अस्वस्थतता लक्षात घेऊन चीनने पाकिस्तानसोबतच्या संबंधात कुठलाही फरक पडणार नाही. दोन्ही देशांचे संबंध पूर्वी होते तसेच दृढ राहतील असे चीनने आश्‍वासन दिले होते. अफगाणिस्तानमध्ये भारताचे महत्व वाढू नये अशी पाकिस्तानची इच्छा आहे पण आता जिनपिंग यांनी भारतासोबत संयुक्त आर्थिक प्रकल्पावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी आणि जिनपिंग यांनी अफगाणिस्तानसंबंधी घेतलेल्या या निर्णयामुळे दोन्ही देश आशियाई क्षेत्रात फक्त स्पर्धकच नसून परस्परांचे चांगले सहकारी असल्याचाही संदेश जाईल. चीन अफगाणिस्तानमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे. अफगाणिस्तान सीपीईसीमध्ये सहभागी झाल्यानंतर तिथे रोड आणि रेल्वे नेटवर्क उभारण्यात येईल. ज्यामुळे चीनला आपला व्यवसाय विस्तार करता येईल. आर्थिक विकासातूनच अफगाणिस्तानची दहशतवादातून सुटका होईल असे चीनचे मत आहे.

भारतालाही सीपीईसी प्रकल्पामध्ये सहभागी करुन घ्यायला चीन प्रयत्नशील आहे. विकासाची नवी दिशा पंतप्रधान मोदी यांनी भारताला दाखवली, तशी ती आशियायी खंडातील गरीब राष्ट्रांना दाखवणार आहेत का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या अफगाणिस्तानात तालीबान आणि ओसामा बिन लादेन यांचे समुळ उच्चाटन करण्यात आले. त्यानंतर मात्र अमेरिकाने या राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी तितकेसे प्रयत्न केले नाही. आज अफगाणिस्तान वाळवंटाऐवजी दुसरे काही नाही. त्यामुळे या ठिकाणी विकास घडवून आणण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यासाठी चीनशी संयुक्त करार करण्याचा निर्णयही मोदी यांनी घेतला आहे. हे मोदी यांच्या विकासाभिमूख राजकारणाची चुणूक आहे. अर्थात याला अमेरिकेचीही फारशी हरकत नसेल, कारण यासाठी भारताचा पुढाकार आहे आणि भारत हा अफगाणिस्तानपासून फार जवळचा देश आहे. त्यामुळे सातत्याने अफगाणिस्तानशी संबंध जोडले जाणार आहे. त्यात चीनसारख्या आर्थिकदृष्ट्या सक्षम राष्ट्राला सोबत घेऊन पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला विधायक दिशा देण्याची आखणी केली आहे. कारण भारताला कायम त्रासदायक ठरावे म्हणून पाकिस्तानने चीनना पाकव्याप्त काश्मीरमध्ये आर्थिक कॉरिडोरसारखे उपक्रम राबवण्याचे उद्युक्त करून भारत-चीन या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंतप्रधान नरेंद मोदी यांनी चीनला थेट अफगाणिस्तानात नेण्याचा विचार मांडल्यामुळे पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटणार आहे. तसेच भारताशी अफगाणिस्तान आणखी जवळ येणार आहे. आज पाकिस्तानला डोकेदुखी असणारे एकमेव राष्ट्र अफगाणिस्तान आहे. तेथील पाकिस्तानची सीमा कायम तणावात असते, त्या अफगाणिस्तानला पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विकासाच्या माध्यमातून मित्र बनवण्याचे धोरण चीनच्या मदतीने आखून अत्यंत हुशारीची खेळी खेळली आहे.