मोदींची लहर निफ्टीला बहर

0

नवी दिल्ली, मुंबई – 2013 मध्ये सत्तेवर आलेले भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरातील विविध निवडणुकात घौडदौड, आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी भारताच्या बाजूने दाखविलेला कौल आणि कर व आर्थिक सुधारणांमुळे गेले काही दिवस सातत्याने तेजीत असलेला भारतीय शेअर बाजार मंगळवारी नव्या उंचीवर पोहोचला. रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपतिपदी शपथग्रहणाची तयारी सुरु असतानाच शेअर बाजारात कारभार सुरू होताच राष्ट्रीय निर्देशांक ‘निफ्टी’ने इतिहासात पहिल्यांदाच 10 हजार अंकांचा टप्पा गाठला. मुंबई निर्देशांक, सेन्सेक्सनेदेखील 100 अंकांची उसळी घेतली.

गेल्याच आठवड्यात सेन्सेक्सने पहिल्यांदा 32 हजाराचा आकडा पार केला होता. निफ्टी 10 हजाराचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज सोमवारीच वर्तवण्यात आला होता. मंगळवारी बाजारपूर्व सौद्यात जेव्हा 34 अंकांनी वधारून निफ्टी 10,010 वर खुला झाला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. तेजीचा अंदाज होताच मात्र ते इतक्या लवकर घडेल, असे कुणालाही वाटत नव्हते. अवघ्या 92 ट्रेडिंग सेशन्समध्ये निफ्टीने 9,000 ते 10,000 हा पल्ला गाठला. निफ्टीला या ऐतिहासिक उंचीपर्यंत पोहोचवण्यात रिलायन्स इंडस्ट्री, मारुती, अदानी पोर्ट, इंडियाबुल मार्केट, बँक आदी कंपन्यांचा मोठा वाटा आहे.

2014 भाजपाचा विजय
7000 पार गेला निफ्टी

2015 मोदीपर्वाची वाटचाल
9000 निफ्टीचा टप्पा पार

2017 जीएसटी, दमदार मान्सून
10000 वर निफ्टीची उसळी