नंदुरबार: आज रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकर्यांच्या सुकाणू समिती आणि शासनाच्या मंत्रीगटाच्या समितीची संयुक्त बैठक पार पडली. तत्पूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारवर चांगलीच आगपाखड केली. ‘नरेंद्र मोदी यांनी वापरलेले कोट जरी विकले, तरी महाराष्ट्रातील शेतकर्यांची कर्जमाफी होईल’, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे केली.
कालपर्यंत शेतकर्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसला शिव्या घालत होतो, म्हणून तीन वर्षांपूर्वी वाजत-गाजत ज्यांना सत्तेवर बसवले ते मात्र चोर निघाले. आता त्यांच्याकडून हिशेब मागत आहे म्हणून त्यांच्या जिव्हारी लागत आहे, असे म्हणत राऊत यांनी राज्य सरकारला घरचा अहेर दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील सर्व चोर आता कोणत्या पक्षात आहेत? यांनी वाल्याचे वाल्मीकी करण्याचे मशीन आणले आहे का? असे सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला.
दरम्यान, याच मेळाव्यात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, कर्जमाफीसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे लबाडाच्या घरचं जेवण अशी गत आहे.