मकरसंक्रातीनिमित्त काँग्रेसच्यावतीने आयोजन
पुणे : विकासाची अनेक आश्वासने देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आश्वासनांची पूर्ती करण्याऐवजी फक्त ‘जुमलेबाजीच’ केली आणि जनतेला सतत भावनिक प्रश्नांवर झुलवतच ठेवले. यांची ही सारी जुमलेबाजी जनतेसमोर आणण्यासाठी, संक्रातीला मंगळवारी (दि .15) तळजाई टेकडी येथे काँग्रेसच्या वतीने, ‘जुमला पतंग उत्सव’ आयोजित केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली. संक्रांतीच्या दिवशी दुपारी तीन वाजता काँग्रेसचे कार्यकर्ते तळजाई टेकडीवर जमून पतंग उडवतील आणि या द्वारे अभिनव पद्धतीने मोदी सरकारच्या गैरकारभाराबद्दल निषेध नोंदवतील.
पतंगांवर लिहणार जुमलेबाजीच्या घोषणा
देशाला अच्छे दिन काही दिसले नाहीत. ही सगळी जुमलेबाजी लोकांसमोर आणण्यासाठी त्याबाबतच्या घोषणा पतंगांवर लिहील्या जातील आणि पतंग हवेत उडविले जातील, असेही जोशी यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात आश्वासने द्यायचीच असतात, असे सांगत, जुमलेबाजीचे समर्थन केंद्रीय मंत्र्यांकडून केले जाते. या सर्व प्रकारांबद्दलची चीड व्यक्त करून, त्याविरूद्ध निषेध नोंदविण्यासाठी हा जुमला पतंग उत्सव आयोजित केला असून, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.
पंतप्रधानांची आश्वासने हवेत विरली
अच्छे दिन येतील, 2 कोटी तरुणांना नोकर्या देऊ, विदेशातील काळा पैसा परत आणू, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रूपये जमा केले जातील, पारदर्शी कारभार करू, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ, शंभर स्मार्ट सिटी, डिजीटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, प्रत्येक गरीबाला स्वतःचे घर, स्वस्त औषधे उपलब्ध करू, सुटसुटीत करप्रणाली आणू, चीन व पाकिस्तानला धडा शिकवू, दहशतवादाचा बिमोड करू, काश्मीर प्रश्न निकालात लावू, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहकार्य करू, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करू, विदेशवारीकरून भरपूर परदेशी गुंतवणूक आणू, अशा असंख्य आश्वासनांचे पतंग उडवतच मोदी सत्तेवर आले. त्यांच्या साडेचार वर्षाच्या कारभारात वरील आश्वासने हवेत विरली आणि केवळ जुमलेबाजी केल्यामुळे लोकांचा प्रचंड अपेक्षाभंग झाला आहे.