नवी दिल्ली: देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायद्यावरून वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी या कायद्याला विरोध सुरु आहे. एनआरसी लागू झाल्यास नागरिकत्व जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. माहितीच्या अधिकाराखाली शुभांकर सरकार यांनी पंतप्रधान मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचा तपशील मागितला होता. त्यावर नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ अंतर्गत पंतप्रधान मोदी जन्माने भारतीय आहेत. त्या आधारे ते भारतीय ठरतात. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्व दाखल्यांचा प्रश्नच उद्भवत नाही, असं उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ मध्ये भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख आहे. यानुसार उपकलम २ सोडून प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे. त्यामुळे २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ दरम्यान भारतात जन्मलेली व्यक्ती भारतीय ठरते. १ जुलै १९८७ पासून नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू होईपर्यंत भारतात जन्मलेली किंवा आई-वडिलांपैकी कोणीही भारतीय असलेली व्यक्ती भारतीय ठरते. नागरिकत्व संशोधन कायदा २००३ लागू झाल्यानंतर मात्र यात थोडा बदल होतो. २००३ नंतर जन्मलेल्या व्यक्तीचे आई-वडील भारतीय असल्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक ठरते. या व्यक्तीच्या आई-वडिलांपैकी एकही जण अवैध प्रवासी असल्यास ती भारतीय नागरिक ठरत नाही.
माहिती अधिकाराच्या माध्यमातून याआधीही पंतप्रधान मोदींबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. मोदी राजकारणात येण्यापूर्वी रामलीलामध्ये काम करायचे का? मोदी रामलीलामध्ये काम करत होते, तर मग तिथे ते कोणतं पात्र साकारायचे, असे अजब प्रश्न आतापर्यंत माहिती अधिकारातून विचारण्यात आले आहेत. मोदींचा मोबाईल नंबर, त्यांना वर्षाकाठी किती सिलिंडर लागतात, त्याचं बिल उपलब्ध आहे का, असे प्रश्नदेखील पंतप्रधान कार्यालयाला विचारले गेले आहेत.