नवी दिल्ली । मुंबईकर,भारतीय संघाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. अजिंक्य रहाणेने सोशल मीडियावर पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील या शिलेदाराला आमंत्रण पत्र लिहिले होते. या पत्रात मोदींनी रहाणेला स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते.
अजिंक्य रहाणेने पंतप्रधान मोदींच्या पत्राचा फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. त्याचे उत्तर देताना रहाणेने लिहिले आहे की, आदरणीय नरेंद्र मोदी जी, तुमचं पत्र मिळाल्याने मी फारच आनंद आहे. स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होणे ही माझ्यासाठी सन्मानजनक बाब आहे. संपूर्ण देशात सफाई आणि स्वच्छता करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने हे अभियान सुरु केले आहे. पंतप्रधानांनी रहाणेला 15 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार्या या स्वच्छता अभियानात सामील होण्याचे आवाहन केले आहे. या अभियानात देशातील नागरिकांनी सहभागी व्हायला हवे, असेही म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी 2 ऑक्टोबर 2016 रोजी गांधी जयंतीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्वच्छ भारत अभियानात भाग घेतला होता. कोहली आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंनी कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमची स्वच्छता केली होती.