अहमदाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधु प्रल्हाद मोदी यांनी मोदी सरकारविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रल्हाद मोदी हे गुजरात घाऊक दुकानदार मालक संघटना आणि परवानाधारक रॉकेल विक्रेता संघटनेचे अध्यक्ष आहेत. 28 मे पर्यंत आपल्या मागण्या मान्य न केल्यास गुजरातमधील घाऊक विक्रेते अनिश्चितकालीन संपावर जातील, असा इशारा प्रल्हाद मोदी यांनी दिला आहे.
गुजरातचा रॉकेलचा साठा कमी करण्यात आला आहे. यामुळे सरकारने दुकानदारांना उज्ज्वला योजनेनुसार गॅस सिलिंडर विकण्याची परवानगी द्यावी. तसेच दुकानदारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी, अशा मागण्या प्रल्हाद मोदी यांनी केल्या आहेत. मगुजरात मरॉकेलमुक्तफ राज्य करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. राज्याचा रॉकेलचा साठाही कमी केला आहे. याबरोबरच सरकारने ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठाही सुरू केला आहे. यामुळे रॉकेल विक्रेते अडचणीत आले आहेत, असे प्रल्हाद मोदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
उज्ज्वला योजनेनुसार मिळत असलेले सिलिंडर आणि 5 किलोचे सिलिंडर पुरवठ्याचे काम रॉकेल विक्रेत्यांना द्यावे. गुजरातमध्ये किमान 22 हजारांहून अधिक घाऊक दुकानदार मालक आणि परवानाधारक रॉकेल विक्रेते आहेत. ते 1.2 कोटी रेशनकार्ड धारकांना सामानाची विक्री करतात. यात गरीबी रेषेखालील आणि अंत्योदय योजने अंतर्गत असलेल्यांचा समावेश आहे, असे प्रल्हाद मोदी म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित मंत्र्यांकडे आम्ही आपल्या मागण्या मांडल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर आमच्या मागण्या मांडण्याचं आश्वासन मंत्री जयेश रडाडिया यांनी दिले आहे. पण अद्याप यावर कुठलाही निर्णय झालेला नाही, असेही प्रल्हाद मोदी यांनी सांगितले आहे.