मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जानेवारीला एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. सध्या राजकीय वर्तुळात या मुलाखतीवरुन चर्चा रंगली आहे. भाजपाचा मित्रपक्ष आणि केंद्र आणि राज्याच्या सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेने देखील पंतप्रधानांच्या या मुलाखतीवर टीका केली आहे. या मुलाखतीत मोदी अनेक विषयावर बोलले, पण त्यातून जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली का? असा सवाल सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले, असा टोला देखील शिवसेनेने लगावला आहे.
चार वर्षात पहिल्यांदाच खरे बोलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या प्रश्नाबाबत घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेने टीका केली आहे. राममंदिरासाठी अध्यादेश काढावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह शिवसेनेची होती. मोदी यांनी ती साफ ठोकरून लावली आहे. काही झाले तरी अध्यादेश काढणार नाही. राममंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल. असे मोदींनी म्हटले आहे. गेल्या चार पाच वर्षांत ते पहिल्यांदाच खरे बोलले आहेत. राम मंदिर त्यांच्यासाठी अग्रक्रमाचा विषय नाही. रामाच्या नावावर सत्ता मिळाली व कायद्याचे राज्य त्यांच्या हाती आले तरी श्रीराम हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत हे त्यांनी सांगितले. मोदी यांच्या बहुमताच्या राज्यात राममंदिर होणार नसेल तर कधी होणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
नोटाबंदी, पाकिस्तान, परदेशातील काळा पैसा या प्रश्नांवर मोदींनी दिलेल्या उत्तरांवरही सामनातील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान हे बचावात्मक पवित्र्यात दिसले व मुलाखतही नेहमीच्या भाषणासारखीच होती. २०१९ ची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर, अंगप्रदर्शनात स्पष्टपणे दिसत होती. हेच सत्य आहे, असा टोलाही सामनातील अग्रलेखातून लगावण्यात आला.