मोदींच्या रंगात रंगला उत्तर प्रदेश

0

मुंबई । लोकसभेच्या मागील निवडणुकींच्या वेळी तयार झालेली मोदी लाट अजूनही ओसरलेली नाही हे उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुक निकालानंतर स्पष्ट झाले. खरेतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणे मोदी नावाची लाट नव्हती, पण पुन्हा एकदा वेगवेगळ्या डावांची आखणी, रणनीती आखत भाजपने उत्तर प्रदेशात अनेक अजेंडा राबवले. त्यातला एक होता नरेंद्र मोदींच्या नावाने जुगार खेळण्याचा. भाजपचा हा पत्ता एवढा चालला की सर्व विरोधकांना चितपट करून नरेंद्र मोंदीनी उत्तर प्रदेशात भाजपला ना भुतो ना भविष्याती असे यश मिळवून दिले.

नरेंद्र मोदी नावाची खूप चलती आहे हे उत्तर प्रदेशातील भाजपच्या नेत्यांना चांगले माहीत होते. त्यामुळे या नावाचे मार्केटिंग करण्यात भाजपने उत्तर प्रदेशात कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांनतर राज्यातील जाट मतदार लांब जातायेत हे लक्षात आल्यावर भाजपच्या नेत्यांनी तिसर्‍या टप्प्यात रणनितीच बदलून टाकली. जुन्या रणनीतीप्रमाणे नरेंद्र मोंदी एका आठवड्यात दोन रॅली काढणार होते. पण तिसर्‍या टप्प्यात मात्र, आठवड्यात तीन रॅली करण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात आले. त्यामुळे राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये रॅली काढण्यात आल्या. खुद्द मोदींच्या लोकसभा मतदारसंघात आणि पुर्वांचलमध्ये उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यामुळे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील तब्बल 12 मंत्री शेवटच्या टप्प्यात वाराणसीमध्ये तळ ठोकून नाराजांची समजूत काढत होते. नव्वदच्या दशकानंतर देशात दहशतवादी कारवाया वाढल्यानंतर खचितच देशाचा पंतप्रधान थेट लोकांमध्ये सामील झाला असेल. पण मोदींनी विशेष सुरक्षा पथकांशी सल्लामसलत करून रॅलीच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपच्या अनेक उमेदवारांचा विधानसभेत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला. मोदींच्या रोड शोने बाजी पलटवल्याचे राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेत्यांनीही मान्य केले आहे.

कब्रस्तानाप्रमाणे स्मशानही पाहिजेच
निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये भाजप पिछाडीवर पडला होता. पण 19 फेब्रुवारीला फतेहपुरमध्ये झालेल्या सभेतील भाषणापासून मोंदींनी निवडणुकीचा नूरच पालटून टाकला. फतेहपुरमध्ये मतदारांशी संवाद साधताना, गावात जर कब्रस्तान बनत असेल तर स्मशानही बनायलाच पाहिजे. रमझानच्या दरम्यान वीज दिवसभर उपलब्ध होत असेल तर दिवाळीतही वीज मिळायला पाहिजे, असे सांगत लोकांच्या भावनिक मुद्द्याला हात घातला. त्यात केंद्रीय ऊर्जामंत्री विजय गोयल यांनी नंतरच्या प्रचारात या दोन सणांदरम्यान झालेल्या राज्यातील वीज वाटपाचे आकडे देत वातावरण शांत होणार नाही, याची काळजी घेतली. मोदींनी कब्रस्तान आणि स्मशानाचा राग आळवल्यावर भाजपच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान राज्यातील यादव आणि मुस्लीम समुदायातील नागरिकांच्याविरोधात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखिलेशच्या राज्यात जात आणि धर्माच्या आधारावर पक्षपात केला जात असल्याचा संदेश मतदारापर्यंत भाजपने व्यवस्थित पोहचवला. याशिवाय तिहेरी तलाकाच्या मुद्यावर भाजपला मतदान होऊ नये म्हणून मुस्लीम महिलांना मतदान करू दिले जात नसल्याचा संदेश भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जाणिवपूर्वक सगळीकडे पसरवला. भाजपच्या या संदेशामुळे शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये अखिलेश यादव आपल्या अजेंडापासून भरकटत गेले. त्यातून त्यांनी गुजरातच्या गाढवांचा मुद्दा उकरून काढला तेव्हाच भाजप नेत्यांच्या चेहर्‍यावर राज्यात कमळ फुलणार असल्याचे संकेत दिसायला लागले.

नोटबंदी गरिबांसाठी फायदेशीर
नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या नोटबंदीवरून मोदी सरकार आणि भाजपवर वारेमाप टिका करण्यात आली. निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात हा मुद्दा ही भाजपसाठी त्रासदायक ठरत होता. पण नरेंद्र मोदींनी प्रचाराला सुरुवात केल्यावर नोटबंदीचा मुद्दाच भाजपला विजयाचे स्वप्न दाखवू लागला. राज्यात काढलेल्या परिवर्तन रॅलीतून भाजप गरीबांचा पक्ष असून नोटबंदीमुळे ब्लॅकमनी कमावणार्‍या मायावती आणि काँग्रेससारख्या पक्षांचे मोठे नुकसान झाल्याचे मोंदीनी ठासून सांगितले.

महराष्ट्रातील निकाल परिणामकारक
उत्तर प्रदेशातील निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक निकालांनीही मोठी भूमिका बजावली. महाराष्ट्रात झालेल्या 10 महापालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल 23 फेेब्रुवारीला जाहीर करण्यात आले. त्यावेळी उत्तर प्रदेशात मधल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली होती. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौलही उत्तर प्रदेशात भाजपसाठी फायदेशीर ठरला.

पक्षाची जुनी प्रतिमा पुसली
ब्राम्हण, वाणी लोकांचा पक्ष अशी प्रतिमा झाल्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात मोठे यश मिळत नव्हते. त्यामुळे 2014 मधील लोकसभा निवडणुकांनंतर भाजपने यादव आणि जाट समाजव्यतिरीक्त इतर मागासवर्गीय आणि दुर्लक्षित समाजांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. मोदी प्रचारात उतरल्यावर भाजपने त्यांना दुर्लक्षित समाजाचा नेता म्हणून पुढे आणले. याशिवाय मुलायम असो कि मायावती, सत्तेत आल्यावर सगळ्यात जास्त फायदा त्यांच्याच समाजातील लोकांचा होतो, असाही प्रचार यावेळी करण्यात आला. उत्तर प्रदेशात एकुण 45 टक्के मतदार हा मागासवर्गीय समाजांमधील आहे. त्यात 9 टक्के यादव आणि उर्वरीत दुर्लक्षित अशा जातींचे मतदार आहेत. त्यामुळे भाजपने या दुर्लक्षित समाजाला आपल्याकडे खेचताना त्यांच्या लोकांना प्रतिनिधीत्व दिले. भाजपची ही चालही त्यांना स्पष्ट बहुमताकडे घेऊन गेली.