मोदींच्या वर्ध्यातील सभेला अपेक्षित प्रतिसाद नाही

0

वर्धा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारार्थ सभा घेतली. निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मोदींची आजची पहिलीच सभा होती. पहिल्याच सभेला अपेक्षित प्रतिसाद न मिळू शकल्याने भाजपच्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्धा येथील स्वावलंबी मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वावलंबी मैदान सुमारे १८ एकरचे असून हे पूर्ण मैदान भरेल या अपेक्षेने सारी व्यवस्था करण्यात आली होती. मैदानाच्या पाऊण भागात खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. सभास्थळी सकाळपासून कार्यकर्त्यांचा ओघही सुरू झाला. मात्र, सभा सुरू झाली तरी अर्धे मैदानही भरले नाही. एका बाजूच्या खुर्च्या तसेच मैदानाची मागील बाजू पूर्णपणे रिकामीच होती.

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून मंडपाची व्यवस्था न करता भर उन्हात ही सभा घेण्यात आल्याने सभेला अपेक्षित गर्दी होऊ शकली नाही, असे सांगितले जात असले तरी वर्ध्याच्या सभेतील मोकळे मैदान भाजपची चिंता वाढवणारे ठरले आहे. दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी वर्ध्यातूनच महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात केली होती. मोदींच्या त्या सभेला अलोट प्रतिसाद मिळाला होता. त्या तुलनेत आजची सभा फ्लॉप ठरली असून सोशल मीडियातही सभेच्या मोकळ्या मैदानाचे फोटो व्हायरल होत आहेत.