मोदींच्या विरोधात हार्दिक पटेलची न्याय यात्रा

0

अहमदाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय गुजरात दौर्‍याचा निषेध पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी नोंदवला. आजपासून त्यांच्या दौर्‍याला सुरुवात झाली. आफ्रिकन डेव्हलपमेंट बँकेच्या सर्वसाधारण बैठकीलाही मोदी उपस्थित राहणार आहे. बैठकीत विकासकामांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मोदी कच्छमध्ये दोन सभांना संबोधित करतील. कांडला पोर्टमध्ये सोमवारी उपक्रमांच्या उद्घाटनाने मोदी यांच्या दौर्‍याला सुरुवात झाली. मोदींचा गुजरातमधील यंदाचा हा तिसरा दौरा आहे. पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने आपल्या 50 कार्यकर्त्यांसोबत मुंडण करून नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याला कडाडून विरोध केला. यावेळी पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी एक न्याय यात्राही काढली. पाटीदार समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारच्या विरोधात ही यात्रा काढण्यात आली आहे.

गुजरात दौर्‍यापूर्वी मोदींनी केले ट्विट
रविवारी मोदींनी ट्वीट करून आपल्या गुजरात दौर्‍याची माहिती दिली. मी सोमवारपासून दोन दिवसीय गुजरात दौरा करणार आहे. यादरम्यान गांधीनगर आणि कच्छमध्ये होणार्‍या सभांना संबोधित करणार आहे. कांधलापोर्टमध्ये काही प्रोजेक्ट्सच्या उद्घाटनाने दौर्‍याला सुरुवात होईल.

हार्दिक पटेल याने जुलै 2015 पासून गुजरातमध्ये पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली सरकारने हार्दिक पटेलू याला सहा महिने हद्दपार केले होते. सहा महिने राजस्थानमध्ये राहिल्यानंतर 5000 गाड्यांच्या ताफ्यात हार्दिक पटेल गुजरातमध्ये परतला होता. रतनपूर या राजस्थान सीमेवरील गावात त्याच्या समर्थकांनी त्याचे भव्य स्वागत केले. 23 वर्षीय हार्दिक उदयपूर येथे स्थायिक झाला होता. त्याच्या समर्थकांसह त्याने गुजरातमध्ये प्रवेश केला. पटेल समुदायातील शेकडो तरुणांनी जोशात हार्दिकचे स्वागत केले. साबारकांथा जिल्ह्यातील हिम्मतनगर शहरात त्याने रॅलीला संबोधित केले. गुजरातेत दाखल होताच पटेल समुदायाच्या न्याय्य हक्कांचा पुनरुल्लेख हार्दिकने केला. गुजरातच्या भूमिला मी नमन करतो. ही भूमी महान नेत्यांची आणि हुतात्म्यांची आहे. मी नेहमी माझ्या समुदायाच्या न्याय्य हक्कांसाठी लढत राहील, असे पटेल समुदायाच्या रॅलीला संबोधित करताना तो म्हणाला होता.

‘संघटनेच्या 50 सदस्यांनी मुंडण केले. मागील दोन वर्षांपासून आमच्या समाजावर होणार्‍या अत्याचाराचा विरोध केला आहे. पाटीदार समाजाला न्याय मिळावा, म्हणून यात्रा काढण्यात आली आहे. न्याय यात्रा बोथाड येथून सुरू होणार असून भावनगर येथे विसर्जित करण्यात येणार आहे.
– हार्दिक पटेल, पाटीदार समाजाचे नेते